स्त्यावर नियम सांगणाऱ्या जळगाव आरटीओला स्वतःच्या आवारात नियमांचा विसर ;’एचएसआरपी’ नियमांवरून कारभारावर प्रश्नचिन्ह, ड्रायव्हिंग टेस्टच्या वाहनावर संशयास्पद नंबर प्लेट

सामान्य वाहनधारकांवर एचएसआरपी नियमांची कारवाई होत असताना जळगाव आरटीओच्या आवारातील ड्रायव्हिंग टेस्टच्या वाहनाच्या नंबर प्लेटबाबत उपस्थित झालेला सवाल.

जळगाव आरटीओतील ड्रायव्हिंग टेस्ट वाहनाची नंबर प्लेट, फिटनेस, विमा व एचएसआरपी वैधतेची तपासणी करण्याची मागणी; आरटीओ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.

 वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात ‘एचएसआरपी’ नसल्यास सामान्य वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या मोटार वाहन विभागाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारातच ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या एका वाहनावर नियमबाह्य नंबर प्लेट असल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे “नियम सर्वांसाठी समान आहेत की सर्वसामान्यांसाठीच?” असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी’एचएसआरपी’ लागू करण्यात आली असून वाहनांची छेडछाड आणि बनावटपणा रोखणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. मात्र, जळगाव आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या एका वाहनाच्या नंबर प्लेटबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या वाहनावर पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटवर पिवळ्या रंगाचा थर देण्यात आल्याचा आरोप असून, त्यामुळे वाहनाला व्यावसायिक वाहनाचा आभास निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत ‘एचएसआरपी’ची सुरक्षा वैशिष्ट्ये या प्लेटवर आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

आरटीओ कार्यालयाच्या आवारातच असे वाहन वापरले जात असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार का आला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

 मोटार वाहन निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्न
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी चाचणी घेताना वाहनाची आवश्यक कागदपत्रे, नोंदणी, फिटनेस आणि इतर बाबींची पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असते. अशा परिस्थितीत उमेदवारांच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाच्या नंबर प्लेटची वैधता तपासली गेली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सामान्य वाहनधारकांवर ‘एचएसआरपी’साठी कारवाई करणाऱ्या यंत्रणेने स्वतःच्या कार्यालयाच्या आवारातील वाहनांच्या नियमपालनाचीही तितक्याच काटेकोरपणे तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

आरटीओ परिसरातील एजंटांच्या भूमिकेवरही प्रश्न
या प्रकारामुळे आरटीओ कार्यालय परिसरातील एजंटांच्या कार्यपद्धतीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांची कामे करून देणे तसेच ड्रायव्हिंग टेस्टसाठी वाहने उपलब्ध करून देणारे एजंट कोणत्या अधिकृत परवानगीच्या आधारे काम करतात, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, फिटनेस, विमा आणि नंबर प्लेटची वैधता प्रशासनाकडून नियमित तपासली जाते का, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे. अधिकृत परवानगीशिवाय एजंटांचा कारभार सुरू असल्यास त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न
‘एचएसआरपी’च्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करणाऱ्या प्रशासनाने स्वतःच्या आवारातील वाहनांबाबतही समान निकष लागू करणे अपेक्षित आहे. त्यामुळे संबंधित वाहनाची नोंदणी, फिटनेस, नंबर प्लेट आणि ‘एचएसआरपी’ची वैधता यांची तातडीने तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

“रस्त्यावर नियम सांगणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या आवारात नियमांचा विसर कसा पडतो? कायदा सर्वांसाठी समान आहे की आरटीओच्या दारात त्याचे वेगळे नियम आहेत?” असा रोखठोक सवाल जळगावकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!