देऊळवाडेच्या मराठी शाळेत स्वातंत्र्यदिन सोहळा दिमाखात. विद्यार्थ्यांच्या नृत्य व नाटिकांनी जिंकली मने; ग्रामस्थांशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा.
जळगाव जिल्ह्यातील देऊळवाडे गावातील मराठी शाळेच्या प्रांगणात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, सरस्वती पूजन, विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांमुळे स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच निकिता सोनवणे होत्या. गावाचे आदर्श पालक अनिल सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच निकिता सोनवणे तसेच कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी सहकुटुंब पूजन केले.
विद्यार्थ्यांना नोटबुक्स आणि खाऊचे वाटप
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बालगोपाल तसेच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेशही देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने रंगत
कार्यक्रमादरम्यान मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच विविध नाटिकांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
गावाच्या विकासाचा आराखडा ग्रामस्थांसमोर
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गावाच्या विकासाची जोड देत सरपंच निकिता सोनवणे यांनी देऊळवाडे गावाच्या विकासाचा आराखडा ग्रामस्थांसमोर मांडला. यावेळी त्यांनी गावातील विविध समस्या जाणून घेत ग्रामस्थांशी संवाद साधला.
गावातील प्रश्न, विकासाच्या गरजा आणि भविष्यातील नियोजन याबाबत ग्रामस्थांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता गावाच्या विकासाच्या दिशेने संवादाचे व्यासपीठ ठरला.
शाळा प्रशासनाचे विशेष परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक वसंत सपकाळे तसेच गरुड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला उपसरपंच अवंताताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई सोनवणे, सुनंदाबाई सोनवणे, पोलीस पाटील संतोष सोनवणे, ग्रामसेवक गुलाब मोची आप्पा, धरती आबाचे समन्वयक अशोक बोरसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गेंदालाल सपकाळे, श्रीराम सोनवणे, गेंदलाल सोनवणे, माणिक सोनवणे, सोमा जोतीराम सोनवणे, सुरेश भोई यांच्यासह गावातील नागरिक, नवयुवक आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्ती आणि विकासाचा संकल्प
देशभक्तीचा जल्लोष, विद्यार्थ्यांचा उत्साह, सामाजिक उपक्रम आणि गावाच्या विकासाचा संकल्प अशा त्रिवेणी संगमात देऊळवाडे गावाचा ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामुळे गावातील नागरिक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासन यांच्यातील सहभागाची भावना अधिक दृढ झाली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
