पुण्याचा महिला फुटबॉलमध्ये दबदबा; मुंबईला हरवत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद ;अहिल्यानगर तृतीय, ठाणे चौथ्या स्थानावर; याशिका तेजवानी उत्कृष्ट खेळाडू, सोमय्या शेख ठरली सर्वाधिक गोल करणारी खेळाडू

जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा संघाने मुंबईचा ३-० असा पराभव करत २०२५-२६ चे विजेतेपद पटकावले.

पुण्याने मुंबईवर ३-० असा विजय मिळवत महिला फुटबॉलचे राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले. याशिका तेजवानी उत्कृष्ट खेळाडू, सोमय्या शेख सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली.

 वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, गोदावरी फाउंडेशन, पिंच बॉटलिंग आणि स्पोर्ट्स हाऊस जळगाव यांच्या सहकार्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित आंतरजिल्हा महिला खुल्या गटाच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने दमदार कामगिरी करत २०२५-२६ चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पुण्याने मुंबईचा पराभव करत मैदान गाजवले. मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अहिल्यानगरने तृतीय तर ठाणे जिल्ह्याने चौथे स्थान मिळविले.

स्पर्धेतील अंतिम टप्प्यातील सामने अत्यंत चुरशीचे आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या अहिल्यानगर विरुद्ध ठाणे सामन्यात नियोजित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लागला. अहिल्यानगरने ३-१ असा विजय मिळवत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले.

यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात पुणे विरुद्ध मुंबई अशी विजेतेपदासाठी थरारक लढत झाली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला; मात्र एकही गोल झाला नाही. दुसऱ्या हाफमध्ये पुणे संघाने आपला खेळ उंचावत मुंबईवर वर्चस्व निर्माण केले आणि अखेर ३-० अशा शानदार विजयासह विजेतेपदावर कब्जा केला. पुण्याच्या राणी कदम, तनिक्षा आणि रितिका सिंग यांनी गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

 उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव
तृतीय क्रमांकासाठीच्या सामन्यात अहिल्यानगरची राणी कदम हिला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. अंतिम सामन्यात पुण्याची याशिका तेजवानी हिची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार
मुंबईची निकिता देसाई – उत्कृष्ट गोलरक्षक, ठाण्याची साधिका शाम – उत्कृष्ट बचावपटू, पुण्याची रितिका सिंग – उत्कृष्ट आक्रमक खेळाडू, तर अहिल्यानगरची सोमय्या शेख – सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली.

 मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या संघांना ट्रॉफी व पदके, तसेच उत्कृष्ट खेळाडूंना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व क्रीडा साहित्य देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभास जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक दिनेश पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नेहा देशमुख, कोल्हापूरचे राजेंद्र राऊत, वहिदत ए इस्लामीचे अब्दुल वहाब मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यासपीठावर जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, सचिव फारूक शेख, भास्कर पाटील, ताहेर शेख, अँड. आमिर शेख, सिलेक्टर एनी पॉल तसेच पृथ्वी गायकवाड आदी उपस्थित होते.

मी करू शकते, मी करणार आणि मी जिंकणार’चा आत्मविश्वास हवा : स्मिता वाघ
महिला खेळाडूंना मार्गदर्शन करताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, प्रत्येक महिलेच्या मनात ‘मी करू शकते, मी करणार आणि मी जिंकणार’ ही जिद्द असली पाहिजे. विजयाबरोबरच पराभवातूनही शिकण्याची संधी मिळते आणि हा अनुभव भविष्यातील यशासाठी महत्त्वाचा ठरतो. महिलांनी सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

क्रीडाक्षेत्रातून महिलांना करिअरची संधी – वैशाली चव्हाण
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी महिलांना क्रीडाक्षेत्रातून उज्ज्वल करिअर घडविता येते, असे सांगितले. खेळाच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश करून देशसेवा करण्याची संधी महिलांनी साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक संदेशालाही स्पर्धेत महत्त्व
वहिदत इस्लामीचे अब्दुल वहाब मलक यांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने उपस्थित महिला खेळाडूंना सामाजिक प्रबोधनपर मार्गदर्शन केले. कन्याभ्रूणहत्या, आत्महत्या, प्रदूषण आणि नशाखोरी यांसारख्या सामाजिक समस्यांविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

फिजिओ, वैद्यकीय पथक, १०८ रुग्णवाहिका व पंचांचा गौरव
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगदान देणाऱ्या फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर, पंच तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिका सेवेला जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे क्रीडा साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.

संघटनात्मक नियोजनातून स्पर्धेचे यश
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, स्वयंसेवकांनी, पंचांनी, वैद्यकीय पथकाने आणि सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी अथक परिश्रम घेतले. महिला फुटबॉलला व्यासपीठ उपलब्ध करून देत जळगावमध्ये राज्यस्तरीय दर्जाची स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!