खोटे नगर येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई. चारा-पाण्याची व्यवस्था नसताना वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.
जनावरांना क्रूरतेने वागणूक देत आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र, खरेदी-विक्रीची कागदपत्रे तसेच वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा नसताना दोन बैलांची अवैध वाहतूक केली जात असल्याचा प्रकार जळगाव तालुका पोलिसांनी उघडकीस आणला. खोटे नगर स्टॉप परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीचे दोन बैल जप्त केले आहेत.
२५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खोटे नगर स्टॉपजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार, गजानन उखडू रामसे (वय ४८, रा. गुरुदत्त नगर, मानवसेवा शाळेजवळ, जळगाव) याच्याकडून दोन बैल आढळून आले. प्रत्येक बैलाची अंदाजे किंमत २० हजार रुपये असून, दोन्ही बैलांची एकूण किंमत ४० हजार रुपये आहे.
पोलिसांच्या तपासात हे दोन्ही बैल बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे समोर आले. मात्र, त्यांच्याकडे बैलांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही व्यवस्था नसल्याचे आढळून आले.
बैलांना MH 48 T 3877 क्रमांकाच्या वाहनात बांधून वाहतूक करण्यात येत होती. वाहनात जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५७/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(सी), ११(१)(डी), ११(१)(झेड) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दोन्ही बैल ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक विजय अमृत निकम करीत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
