मॉडिफाईड सायलेन्सरविरोधात पोलिसांची धडक मोहीम; २६ सायलेन्सर रोड रोलरखाली नष्ट

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींवरील २६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून रोड रोलरखाली नष्ट; ध्वनिप्रदूषणाविरोधात पोलिसांची कठोर कारवाई.

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींवर जळगाव पोलिसांची कारवाई. २६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून रोड रोलरखाली नष्ट करण्यात आले.

जळगाव  शहरात कर्कश आवाज करणाऱ्या तसेच मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेट मोटरसायकलींविरुद्ध जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या २६ बुलेट मोटरसायकलींचे मॉडिफाईड सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ताब्यात घेतलेल्या या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले.

कर्कश आवाज करणारे अथवा कंपनीच्या मूळ स्वरूपात बदल करून बसविलेले मॉडिफाईड सायलेन्सर वापरू नयेत, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे. अशा वाहनांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो.

त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कंपनीने निर्धारित केलेले मूळ सायलेन्सरच वापरावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कारवाई यापुढेही सुरू राहणार
कर्कश आवाज करणाऱ्या आणि मॉडिफाईड सायलेन्सर बसविलेल्या वाहनांची तपासणी व कारवाई यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारचे सायलेन्सर आढळल्यास संबंधित वाहनचालकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

‘कर्कश आवाज नाही; शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध जळगाव हवे!’ असा संदेश देत पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियम पाळून ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश अहिरे, अफजल बागवान आणि फिरोज तडवी यांनी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!