ऑनलाइन फसवणूक, फोटो मॉर्फिंग, बनावट लिंक आणि AIच्या सुरक्षित वापराबाबत श्री रामनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्विक हील फाऊंडेशनतर्फे मार्गदर्शन.
आलमला, ता. औसा, जि. लातूर : राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यात तसेच परिसरातील गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या जनजागृती उपक्रमांतर्गत श्री रामनाथ विद्यालय, आलमला येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात पार पडले.
या एकदिवसीय प्रशिक्षणादरम्यान इयत्ता पाचवी ते दहावीतील २५० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सायबर ऑफिसर योगिता जाधव आणि सायबर ऑफिसर प्राजक्ता बोरुळे यांनी फोटो मॉर्फिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)च्या माध्यमातून फोटो तयार करणे, AIचा सुरक्षित व जबाबदारीने वापर तसेच मजबूत पासवर्डचे महत्त्व याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली. तसेच मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाउनलोड करताना कोणत्या परवानग्या द्याव्यात आणि कोणत्या परवानग्या देणे टाळावे, याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय ऑनलाइन फसवणूक, बनावट संकेतस्थळांच्या लिंक, OTP फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता आणि डिजिटल गोपनीयता याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगणे आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करणे, याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर धोक्यांची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल सवयींचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समजले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ आंबुलगे यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षकवृंद व इतर सदस्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारून जबाबदार डिजिटल नागरिक बनावे, असे आवाहन करण्यात आले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
