आ. ग. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ‘विचार करा आणि मगच क्लिक करा’ संदेशातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे.
आ. ग. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथे क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून सायबर सुरक्षा आणि सायबर फसवणूक प्रतिबंधाबाबत जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील संभाव्य धोके आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाच्या काळजीबाबत या सत्रातून मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनी वैष्णवी सैतवाल आणि जान्हवी सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली. 
विद्यार्थ्यांना ओटीपी फ्रॉड, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक, पासवर्ड सुरक्षा आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद फोन कॉलला प्रतिसाद देणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.
सायबर सुरक्षेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हॅकर मास्कच्या माध्यमातून विशेष ॲक्टिव्हिटी घेण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास मुख्याध्यापक गणू भालेराव आणि उपशिक्षक संजू महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी “विचार करा आणि मगच क्लिक करा” हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच ओटीपी, पिन आणि पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, याबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
क्विक हील फाउंडेशनच्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सतर्क, सुरक्षित आणि जबाबदार नागरिक बनवणे हा होता. सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
