तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांसाठी विशेष शिबिर ;विविध शासकीय योजनांची माहिती; आरोग्य, रोजगार, उद्योजकता आणि कायदेविषयक मार्गदर्शन

धाराशिव येथे तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण, रोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता आणि विविध शासकीय कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रम.

धाराशिव येथील विशेष शिबिरात तृतीयपंथीयांना हक्क, रोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास आणि कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन; सन्मानाने जगण्याचा संदेश.

 तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात विशेष शिबिरे, जनजागृती मोहीम, जाणीव-जागृती कार्यशाळा, स्वयंरोजगार मेळावे, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तृतीयपंथीय व्यक्तींना कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सुरू करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, धाराशिव आणि राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी सामाजिक न्याय भवन सभागृह, धाराशिव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास रवि सानप, पोलीस उपअधीक्षक श्री. गुरव, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे प्रतिनिधी, नाशिक विभागातील अशासकीय सदस्य तृतीयपंथी व्यक्ती श्रीमती शेख व श्रीमती पानसे, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले यांनी केले.

तृतीयपंथीयांना सन्मानाने जगण्याची संधी आवश्यक

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी तृतीयपंथीयांना समाजाने सौजन्याने वागणूक देणे, त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

तसेच तृतीयपंथीयांसाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती योजना, व्यवसायाच्या संधी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कौशल्य विकास व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

श्री. गुरव यांनी कौशल्य विकास विभागामार्फत तृतीयपंथीयांना आर.सी.टी.च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षणाच्या संधी, रोजगाराच्या संधी तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना याबाबत मार्गदर्शन केले.

उमेदचे श्री. भांगे यांनी बचत गटांची निर्मिती करून तृतीयपंथीयांची आर्थिक परिस्थिती अधिक सक्षम कशी करता येईल, याबाबत माहिती दिली.

जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांनी विविध रोजगार व स्वयंरोजगाराशी संबंधित शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच नाशिक विभागातील अशासकीय सदस्य तृतीयपंथी व्यक्तींनी तृतीयपंथीयांच्या विविध समस्या, हक्क आणि गरजांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली आवाड, शहर अभियान व्यवस्थापक, नगर परिषद, धाराशिव यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान तहसील कार्यालय, कौशल्य विकास विभाग तसेच इतर संबंधित विभागांमार्फत उपलब्ध असलेल्या विविध योजना व सेवांबाबत तृतीयपंथीयांना माहिती देण्यात आली. तृतीयपंथीय समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!