एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य; ऑक्टोबरपासून नियमांची कडक अंमलबजावणी; ७ लाख ७२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी

ऑक्टोबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड नियमाची कडक अंमलबजावणी; जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ७२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी.

ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसह विविध सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी पूर्ण करण्याचे जळगाव एसटी विभागाचे आवाहन.

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता ऑक्टोबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी या नियमाची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ७२ हजार लाभार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे ६ लाख २३ हजार कार्डधारक विविध सवलतींचा लाभ घेत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक यांसारख्या सवलतींचा समावेश आहे.

दरम्यान, एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेली आहे; मात्र अद्याप कार्ड प्राप्त झालेले नाही, अशा लाभार्थ्यांना नोंदणीची पावती दाखवून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कार्ड प्राप्त होईपर्यंत संबंधित लाभार्थ्यांची सवलत कायम राहणार आहे.

ज्या लाभार्थ्यांनी अद्याप एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरवले यांनी केले आहे. ऑक्टोबरपासून नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होणार असल्याने लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!