शेतकरी स्तरावरून पीक पाहणीचा पर्याय तातडीने खुला करा; अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता- हर्षल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची मागणी

खरीप पीक पाहणी २०२६ प्रक्रियेत शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवरून पीक पाहणी नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी हर्षल ठाकरे यांनी मागणी केली आहे.

पीक पाहणीच्या अंतिम टप्प्यात सर्व्हरवरील ताण आणि संभाव्य आर्थिक लूट टाळण्यासाठी शेतकरी स्तराचा पर्याय खुला करण्याची मागणी.

खरीप हंगाम पीक पाहणी २०२६ ही प्रक्रिया ११ ऑगस्टपासून सुरू झाली असून, पीक पाहणीची मुदत आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसांची वाट न पाहता वेळेत आपल्या शेतातील पिकांची पीक पाहणी नोंद करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मात्र, सध्या पीक पाहणी केवळ नियुक्त सहाय्यकांमार्फत करण्याची व्यवस्था असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून स्वतः पीक पाहणी करता येते, त्यांच्यासाठी शेतकरी स्तरावरून स्वतः पीक पाहणी नोंदविण्याचा पर्याय तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हर्षल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी केली आहे.

आज अनेक शेतकरी स्मार्टफोनचा वापर करतात आणि विविध शासकीय ऑनलाइन प्रक्रिया स्वतः पूर्ण करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना केवळ सहाय्यकांवर अवलंबून ठेवणे योग्य नाही. शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची अचूक माहिती नोंदवू शकत असेल, तर त्याला स्वतः पीक पाहणी करण्याची सुविधा मिळाली पाहिजे, असे हर्षल ठाकरे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये

केवळ सहाय्यक स्तरावर पीक पाहणीची सुविधा ठेवल्यास काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून अनावश्यक पैसे आकारले जाण्याची अथवा त्यांच्या आर्थिक लुटीची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी शेतकरी स्तरावरील पर्याय खुला करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने ‘शेतकरी स्तर’ आणि ‘सहाय्यक स्तर’ हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावेत. ज्यांना स्वतः पीक पाहणी करता येते त्यांनी स्वतः नोंद करावी आणि ज्यांना तांत्रिक अडचणी आहेत किंवा स्वतः नोंद करता येत नाही, त्यांनी नियुक्त सहाय्यकाच्या माध्यमातून पीक पाहणी करून घ्यावी. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही तसेच प्रक्रियेत पारदर्शकताही राहील.

शेवटच्या दिवसांत सर्व्हरवरील ताण वाढण्याची शक्यता

पीक पाहणीची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात लोड येऊन तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेवटच्या क्षणी पीक पाहणी नोंदविण्यास अडथळे येऊ शकतात.

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत पीक पाहणी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना स्वतः पीक पाहणी करता येत नाही त्यांनी आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकाशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

“शेतकऱ्यांना सक्षम करण्याऐवजी केवळ सहाय्यकांवर अवलंबून ठेवणे योग्य नाही. शेतकरी स्वतः पीक पाहणी करू शकत असेल, तर त्याला ती सुविधा आणि पर्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांची गैरसोय तसेच संभाव्य आर्थिक लूट टाळण्यासाठी शेतकरी स्तरावरून पीक पाहणीचा पर्याय तातडीने खुला करण्यात यावा,” अशी मागणी हर्षल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!