दिवसभर काम करूनही केवळ २०० रुपये मजुरी देत अल्पवयीन मुलांचे शोषण केल्याचा आरोप; जळगावात बालमजुरीविरोधात कठोर कारवाईची मागणी.
शहरातील चंदूअण्णा नगर चौक परिसरात अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत त्यांचे आर्थिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन गॅरेज चालकांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित बालकांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केजीएन ऑटो गॅरेजचा मालक अरबाज खाटीक याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला, तर जय बजरंग ऑटो गॅरेजचा मालक रोहित पाटील याने १३ वर्षीय बालकाला कामावर ठेवले होते. हे दोन्ही बालक सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत गॅरेजमध्ये काम करत होते.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दिवसभर कष्टाचे काम करूनही या मुलांना केवळ २०० रुपये इतकी अत्यल्प मजुरी दिली जात होती. अल्पवयीन मुलांचे शिक्षण, सुरक्षितता आणि मूलभूत हक्क डावलून त्यांच्याकडून काम करून घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई केली.
कारवाईदरम्यान दोन्ही बालकांची बालमजुरीच्या जोखडातून सुटका करण्यात आली. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी बालमजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार दोन्ही गॅरेज चालकांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरात अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारे काम करून घेतले जाण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अशा शोषणाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
