जळगाव विद्यापीठामध्ये एम.एस.डब्ल्यू. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; ऑनलाईन नोंदणी २५ जूनपर्यंत

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. ४ जुलै रोजी CET परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत आयोजित करण्यात येणार आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व आदिवासी अकादमी नंदुरबार येथील एमएसडब्ल्यू प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; गुणवत्ता यादीनुसार CAP पद्धतीने प्रवेश दिला जाणार.

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न समाजकार्य महाविद्यालये, सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील समाजकार्य विभाग तसेच विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार येथील एम.एस.डब्ल्यू. (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि. ११ जूनपासून सुरू करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेश माहिती पुस्तिका, नोंदणी अर्ज व आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

प्रवेशासाठी नोंदणी शुल्क ७०० रुपये निश्चित करण्यात आले असून ते ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून User ID व Password तयार करून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जामध्ये विषय, ABC ID, आधार क्रमांक, ई-मेल, मोबाईल क्रमांक आदी माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. २५ जून २०२६ आहे. त्यानंतर नोंदणीची संधी उपलब्ध राहणार नाही. अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी दि. २६ ते २९ जून या कालावधीत जवळच्या प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्रावर (ARC) जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.

प्रवेश प्रक्रियेअंतर्गत CET परीक्षा दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत ६० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता वैयक्तिक मुलाखत आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील निश्चित केंद्रांवर होईल.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत दोन फेऱ्या (Round I व II) राबविण्यात येणार असून गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर CAP पद्धतीने प्रवेश वाटप केले जाईल. विद्यार्थ्यांना पसंतीनुसार महाविद्यालय निवडण्याची सुविधा उपलब्ध असेल. पहिल्या फेरीनंतर Freeze व Float पर्यायही दिले जाणार आहेत.

अर्ज पडताळणीसाठी जळगाव, चोपडा, अमळनेर, मोराणे आणि तळोदा यांसह सहा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अडचणींसाठी श्री. यतीन चौधरी (०२५७-२२५७४५३) किंवा support@nmu.ac.in वर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष प्रा. किशोर एफ. पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!