सकल राजपूत समाजाचा एल्गार! जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; घोषणाबाजी करतआंदोलकां रास्ता रोको; दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली

ज्ञानेश्वर मोरे मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी सकल राजपूत समाजाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रास्ता रोको केला.

सकल राजपूत समाजाचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

घोषणाबाजी करत आंदोलकांचा रास्ता रोको; दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली

जळगाव : जामनेर तालुक्यातील कुंभारी येथील ज्ञानेश्वर मोरे यांच्या मृत्यूच्या घटनेने संतप्त झालेल्या सकल राजपूत समाजाने शुक्रवारी जळगावात आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ज्ञानेश्वर मोरे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

या घटनेत प्राणघातक हल्ल्यात ज्ञानेश्वर मोरे यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा यश मोरे गंभीर जखमी झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. न्यायाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात जखमी यश मोरे यालाही आणण्यात आले होते. त्याची उपस्थिती पाहून आंदोलनस्थळी वातावरण अधिक गंभीर झाले.

सकल राजपूत समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने समाजबांधव मोर्चात सहभागी झाले. हातात विविध मागण्यांचे फलक घेत आणि घोषणाबाजी करत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. संबंधित प्रकरणातील आरोपींवर कोणतीही दिरंगाई न करता कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको केला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झाली. मोठ्या संख्येने नागरिक आणि समाजबांधव रस्त्यावर एकवटल्याने परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले निवेदन

आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला न्याय द्यावा तसेच जखमी यश मोरे याला योग्य उपचार व आवश्यक मदत मिळावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

न्यायासाठी समाजाचा आक्रमक पवित्रा

ज्ञानेश्वर मोरे यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे सकल राजपूत समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या मोर्चातून समाजबांधवांनी प्रशासनासमोर आपली नाराजी आणि न्यायाची मागणी ठामपणे मांडली.

ज्ञानेश्वर मोरे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. आता प्रशासन या मागण्यांवर कोणती कार्यवाही करते, याकडे पीडित कुटुंबीयांसह समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!