जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना, रोजगारनिर्मितीवर भर; जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत जळगाव विस्तारित एमआयडीसी, पायाभूत सुविधा विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि स्थानिक युवकांच्या रोजगार निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जळगावात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला.

जळगाव  जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीला विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत जळगाव विस्तारित एमआयडीसीसाठी कुसुंबा, चिंचोली आणि पिंपळे परिसरातील भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. एमआयडीसी क्षेत्रात फायर स्टेशन उभारणीसाठी आवश्यक अंदाजपत्रकीय आराखड्याच्या मंजुरीबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयासाठी एमआयडीसीकडून जागा हस्तांतरण आणि बांधकाम प्रक्रियेबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

ऊर्जा व पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी एमआयडीसीकडून महावितरणला दोन ठिकाणी सबस्टेशन उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय, ट्रक टर्मिनलच्या प्रलंबित बांधकामाचा विषयही बैठकीत चर्चिला गेला. अमळनेर येथील औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

जळगाव शहरातील काशीनाथ चौफुली ते एम-सेक्टर या मार्गाच्या विकासासह बाह्यवळण रस्त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महानगरपालिका हद्दीत महावितरणसाठी दोन जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक विचार करण्यात आला.

दरम्यान, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यांमध्ये एमआयडीसीतील उद्योग आणि विविध औद्योगिक संघटनांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी वीज, रस्ते, पाणीपुरवठा आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. प्रशासन आणि उद्योजक यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करून विकासकामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!