सरस्वती विद्यामंदिरात मानवी साखळीतून साकारली राखी; रक्षाबंधनाचा अनोखा संदेश

रक्षाबंधनानिमित्त सरस्वती विद्यामंदिर, जळगाव येथे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून राखी साकारत ‘स्त्रीचा आदर हीच खरी राखीची भेट’ असा सामाजिक संदेश दिला.

रक्षाबंधनानिमित्त सरस्वती विद्यामंदिरात विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन. मानवी साखळी, राखी बांधणी, घोषवाक्ये आणि स्पर्धांमधून सामाजिक जनजागृती.

सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि सामाजिक संदेश देत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून राखीची आकर्षक प्रतिकृती साकारत रक्षाबंधनाचा अनोखा संदेश दिला. तसेच ‘फुलों का तारों का’ या गीतावर टाळ्यांची कवायत सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.

रक्षाबंधनाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्ये असलेले छोटे बॅनर तयार करून सामाजिक संदेश दिले. ‘स्त्रीचा आदर हीच खरी राखीची भेट’ या संदेशासह विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्त्री सन्मान आणि सामाजिक जाणीवेचा संदेश प्रभावीपणे मांडला.

यावेळी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. विद्यार्थ्यांनीही बहिणींना भेटवस्तू देत त्यांच्या सन्मानाचे आणि संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विविध उपक्रमांमुळे विद्यालय परिसरात रक्षाबंधनाचा उत्साहपूर्ण तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणारा माहोल पाहायला मिळाला.

या उपक्रमाचे आयोजन व नियोजन सुवर्णलता अडकमोल आणि सविता ठाकरे यांनी केले. संस्थाध्यक्ष मनोजकुमार पाटील आणि संचालक रामराजे पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीलिमा भारंबे, सीमा जोशी, सुदर्शन पाटील, दीपाली जगताप, रवी शिंदे आणि दीपाली देवरे यांनी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या पारंपरिक उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देत स्त्री सन्मान, बंधुभाव आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यालयातील हा रक्षाबंधन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!