नुटा बुलेटीनच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या प्रश्नांवरील योगदान, अभिलेखागार, डिजिटल प्रवास आणि भविष्यातील भूमिकेचे विश्लेषण.
उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापक, संशोधक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणारे, शासनाच्या शैक्षणिक धोरणांचा चिकित्सक अभ्यास करणारे, न्यायालयीन निर्णयांचे दस्तऐवजीकरण करणारे आणि शिक्षक चळवळींचा इतिहास जतन करणारे माध्यम म्हणून ‘नुटा बुलेटीन’ हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वातील एक अद्वितीय आणि विश्वासार्ह प्रकाशन म्हणून ओळखले जाते. दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा होत असलेला नुटा बुलेटीनचा सुवर्णमहोत्सव हा केवळ एका नियतकालिकाचा गौरव नसून महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या अर्धशतकाच्या संघर्षमय, वैचारिक आणि संघटनात्मक प्रवासाचा उत्सव आहे.
नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (NUTA) चे अधिकृत द्विसाप्ताहिक मुखपत्र म्हणून नुटा बुलेटीनने गेल्या पन्नास वर्षांत उच्च शिक्षण क्षेत्रातील असंख्य प्रश्न, संघर्ष आणि परिवर्तनांची नोंद प्रामाणिकपणे जतन केली आहे. शिक्षकांच्या सेवाशर्ती, वेतन आयोग, विद्यापीठीय कायदे, पेन्शन, शासकीय निर्णय, न्यायालयीन निकाल आणि विविध शैक्षणिक धोरणांबाबत अधिकृत व अभ्यासपूर्ण माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या बुलेटीनने सातत्याने केले आहे.
आजच्या डिजिटल युगात माहितीचे आदान-प्रदान सहज शक्य असले तरी १९७० च्या दशकात शिक्षक संघटनांसमोर संवादाची गंभीर समस्या होती. शिक्षकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी आणि शासनाच्या धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र माध्यमाची गरज प्रकर्षाने जाणवत होती. या पार्श्वभूमीवर १९७३ च्या सुमारास “कॉलेज कोड नव्याने येऊ घातलेले”, “प्राध्यापक रस्त्यावर कां आले?”, “नवे विद्यापीठ विधेयक: एक कैफियत” आणि “नवीन वेतनश्रेणीबाबतचा शासकीय ठराव: एक निवेदन” अशा पुस्तिकांचे प्रकाशन सुरू करण्यात आले.
त्या काळात संघटनेची आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित होती. १९७४ मध्ये संघटनेचा वार्षिक खर्च अवघ्या काही हजार रुपयांमध्ये भागवला जात असताना मुद्रित नियतकालिक सुरू करणे हे मोठे आव्हान होते. त्यामुळे १९७६ मध्ये चक्रमुद्रित माहितीपत्रकांचे वितरण सुरू झाले. या प्रयत्नांचा परिपाक म्हणून १५ ऑगस्ट १९७७ रोजी नुटा बुलेटीनचा पहिला मुद्रित अंक प्रकाशित झाला आणि उच्च शिक्षण क्षेत्राला एक सक्षम, वैधानिक व दस्तऐवजीकरणक्षम माध्यम प्राप्त झाले.
नुटा बुलेटीनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ बातम्यांचे संकलन करणारे नियतकालिक नाही. शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नांवरील शासन निर्णय, विद्यापीठीय नियम, वेतनश्रेणी, न्यायालयीन निर्णय, संघटनेच्या भूमिका, आंदोलनांचे अहवाल आणि शैक्षणिक धोरणांचे विश्लेषण यांचे अधिकृत दस्तऐवजीकरण या माध्यमातून सातत्याने झाले आहे.
शासनाने जाहीर केलेले जीआर, परिपत्रके, विद्यापीठीय अधिनियम, न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर मार्गदर्शन यांचा संग्रह असल्यामुळे नुटा बुलेटीन उच्च शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक आणि शिक्षकांसाठी संदर्भग्रंथाचे स्वरूप प्राप्त करू शकले आहे.
विशेष म्हणजे शिक्षकांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर नुटा बुलेटीनने विशेषांक प्रकाशित करून धोरणनिर्मिती प्रक्रियेलाही दिशा देण्याचे कार्य केले आहे. जुनी पेन्शन योजना हा त्यातील अत्यंत उल्लेखनीय विषय ठरला आहे . सन २०२४ मधील विधानसभा निवडणुकांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाद्वारे जुनी पेन्शन योजनेविषयीची संपूर्ण, संदर्भयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहिती राज्यातील आमदारांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नुटा संघटनेने केले जेणेकरून सभागृहात बोलण्यासाठी मदत होईल हा त्या मागचा दृष्टीकोन होता. शिक्षक, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात विषयाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा विशेषांक प्रभावी ठरला.
नुटा बुलेटीनचा इतिहास हा तांत्रिक परिवर्तनाचाही इतिहास आहे. अमरावती, नागपूर येथील विविध मुद्रणालयांतून बुलेटीन प्रकाशित होत असताना अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रा. व्ही. व्ही. हेडा, प्रा. व्ही. के. वसू, डॉ. अरुण सातपुतळे, प्रा. अरविंद बारहाते, डॉ. शरद कळणावत, प्रा. बी. बी. हेडा, प्रा. आर. चित्तरंजन, प्रा. डॉ. अनिल सोमवंशी, प्राचार्य डॉ. सुभाष गवई आणि प्रा. डॉ. विवेक देशमुख यांसारख्या कार्यकर्त्यांनी बुलेटीनच्या निर्मिती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९९० च्या दशकात संगणकाधारित डीटीपी प्रणाली उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेण्यात आला. १५ जानेवारी १९९५ रोजी या यंत्रणेचे प्राचार्य पी.सी.काणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले,नुटा बुलेटीनने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत प्रकाशन क्षेत्रात नवे पर्व सुरू केले.
नुटा बुलेटीनच्या इतिहासात माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी केवळ संपादकीय नेतृत्व दिले नाही, तर उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित हजारो महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे जतन करून एक अद्वितीय अभिलेखागार निर्माण केले. आज महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांमध्ये सहज उपलब्ध नसलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे प्रा. बी. टी. देशमुख यांच्या अभिलेखांमध्ये उपलब्ध होऊ शकतात, असा विश्वास शासन यंत्रणेलाही वाटतो. ही विश्वासार्हता अनेक दशकांच्या अभ्यासपूर्ण, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण कार्यातून निर्माण झाली आहे.
शिक्षकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी नुटा बुलेटीनने केवळ माहिती प्रसारित केली नाही, तर अनेक न्यायालयीन लढ्यांमध्ये आधारभूत दस्तऐवज उपलब्ध करून दिले. अनेक खटल्यांमध्ये बुलेटीनमध्ये प्रकाशित झालेल्या शासन निर्णयांचा, परिपत्रकांचा आणि अधिकृत नोंदींचा संदर्भ घेण्यात आला. यामुळे शिक्षकांच्या न्यायलढ्यांमध्ये नुटा बुलेटीन हे एक प्रभावी आणि विश्वासार्ह साधन म्हणून उभे राहिले.
नुटाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नुटा बुलेटीनने डिजिटल युगात प्रभावी प्रवेश केला. त्यांच्या पुढाकारातून बुलेटीनचे डिजिटायझेशन करण्यात आले आणि ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले. २०१४ पासून नुटा बुलेटीनचे सर्व अंक ऑनलाइन उपलब्ध झाल्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिक्षक, संशोधक आणि अभ्यासकांसाठी एक अमूल्य दस्तऐवजी स्रोत उपलब्ध झाला आहे. सुवर्णमहोत्सवी विशेषांकाची संकल्पना आणि त्याची व्यापक अंमलबजावणी हीदेखील त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे.
त्याचप्रमाणे नुटाचे सचिव प्रा. डॉ. नितीन कोगरे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी, संघटनात्मक बळकटीकरण आणि विविध शैक्षणिक प्रश्नांवरील संशोधनाधारित भूमिका यांद्वारे संघटनेच्या कार्याला नवी दिशा दिली आहे.
गेल्या पाच दशकांत उच्च शिक्षण क्षेत्रावर आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाची नोंद नुटा बुलेटीनमध्ये आढळते. १९७३ च्या कॉलेज कोडपासून ते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, वेतन आयोग, अनुदान, विद्यापीठीय कायदे, पेन्शन, सेवा सुरक्षा आणि शिक्षकांच्या प्रतिष्ठेच्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक संघर्षाचा इतिहास या बुलेटीनने जतन केला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील महाविद्यालयीन शिक्षकांशी निर्माण झालेली वैचारिक नाळ हे या प्रवासाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. महानगरांपासून ते अतिदुर्गम भागांपर्यंतच्या प्राध्यापकांना माहिती, मार्गदर्शन आणि वैचारिक आधार देण्याचे कार्य नुटा बुलेटीनने सातत्याने केले.
नुटा बुलेटीनच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना सत्यनिष्ठा, दस्तऐवजीकरण, वैचारिक स्पष्टता आणि शिक्षकहिताची अखंड बांधिलकी ही मूल्ये ठळकपणे दिसून येतात. आर्थिक अडचणी, तांत्रिक मर्यादा आणि बदलत्या परिस्थितीवर मात करत हे माध्यम आजही तितक्याच सामर्थ्याने कार्यरत आहे. बदलती शैक्षणिक धोरणे, विद्यापीठीय स्वायत्ततेचे प्रश्न, संशोधनाची आव्हाने, गुणवत्तेचे निकष आणि तंत्रज्ञानाची वाढती छाया यामध्ये प्राध्यापकांना दिशादर्शक दीपस्तंभाची गरज असते. नुटा बुलेटीनने पाच दशके ही दीपस्तंभी भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे.
प्राध्यापक हा केवळ वर्गात ज्ञानदान करणारा शिक्षक नसून समाजाच्या भवितव्याचा शिल्पकार असतो. त्यामुळे प्राध्यापकांचे प्रश्न हे केवळ वेतन किंवा सेवाशर्तींचे प्रश्न नसून ते शिक्षणाच्या गुणवत्तेशी, ज्ञानसंस्कृतीच्या जतनाशी आणि समाजाच्या बौद्धिक आरोग्याशी निगडित असतात. नुटा बुलेटीनने या व्यापक दृष्टिकोनाला नेहमीच केंद्रस्थानी ठेवले. सुवर्णमहोत्सव हा केवळ भूतकाळाचा गौरव नाही; तो भविष्यासाठीचा संकल्प आहे. शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण, उच्च शिक्षणातील सत्याचा आवाज आणि शैक्षणिक धोरणांचे चिकित्सक विश्लेषण ही भूमिका नुटा बुलेटीन पुढील काळातही अधिक सक्षमपणे पार पाडत राहील, हीच अपेक्षा.
नुटा बुलेटीनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या ऐतिहासिक प्रवासाला मनःपूर्वक अभिवादन !
प्रा. डॉ. प्रशांत विघे
राज्यशास्त्र विभाग प्रमुख,
भारतीय महाविद्याल अमरावती
9326877749

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील माहिती आणि लेख उपलब्ध करून देतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. क्र. -९३२६८७७७४९
