सुप्रीम कॉलनीतील अनधिकृत गोडाऊनवर महापालिकेचा हातोडा; गोमांस प्रकरणानंतर धडक कारवाई

सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव महानगरपालिकेने संबंधित अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करत बांधकाम जमीनदोस्त केले. नियमबाह्य मांस विक्री व साठवणुकीविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला.

महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानंतर सुप्रीम कॉलनीत महापालिकेची कारवाई. संशयास्पद गोमांस प्रकरणानंतर संबंधित अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले.

शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी संबंधित अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करत ते जमीनदोस्त केले.

महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील उघड्यावर मांस विक्री तसेच अवैध मांस विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. सुप्रीम कॉलनी परिसरात संशयास्पद गोमांस आढळल्यानंतर महापालिका प्रशासन आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने तातडीने कारवाई सुरू केली.

शुक्रवारी सकाळपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेत गोमांसाची साठवणूक आणि विक्रीसाठी वापरले जात असल्याचा आरोप असलेले अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले.

 अवैध मांस विक्रीविरोधात कारवाईचा इशारा
महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात नियमबाह्य पद्धतीने मांस विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही सातत्याने कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांच्या आरोग्याची आणि शहरातील स्वच्छतेची काळजी घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!