लातूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात सायबर क्लब ग्रुप क्रमांक ५ने नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत मार्गदर्शन केले.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील सायबर क्लबच्या ग्रुप क्रमांक ५ने यावर्षी सायबर जनजागृतीच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि नरेश पंडित यांनी वर्षभरात ५ हजारांहून अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचवला.
क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या सायबर जनजागृती उपक्रमाला विविध उपक्रमांमुळे व्यापक स्वरूप मिळाले. विविध क्षेत्रांतील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष संवाद, इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी आणि शैक्षणिक उपक्रमांचा वापर करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पोलीस विभाग, पोलीस प्रशिक्षण केंद्र, एसआरपीएफ कार्यालय, रेल्वे कोच यांसह विविध मोठ्या समुदायांमध्ये इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सायबर जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फ्रॉड, फिशिंग, बनावट लिंक, सोशल मीडिया सुरक्षितता आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच राजर्षी शाहू महाविद्यालयाशी संबंधित ग्रामीण भागातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती आणि वैयक्तिक माहिती कोणालाही न देणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे तसेच अनोळखी फोन कॉल व संदेशांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेटी देत विद्यार्थ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधून “सायबर सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी” हा संदेश पोहोचविण्यात आला. शहरापुरती जनजागृती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यावरही विशेष भर देण्यात आला.
सायबर क्लबच्या ग्रुप क्रमांक ५च्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होण्यासोबतच त्यांनी स्वतःच्या कुटुंबीयांमध्ये आणि समाजातही सुरक्षित डिजिटल वापराचा संदेश पोहोचवण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायबर जनजागृतीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत झाली.
वर्षभर सातत्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून डिजिटल सजगता, सुरक्षित ऑनलाइन वर्तन आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव याबाबत नागरिक-विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. “माझा डेटा, माझी जबाबदारी” या विचारातून सुरक्षित डिजिटल समाज घडविण्यासाठी सायबर जनजागृती सुरू ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
