‘Think Before You Click’ पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
वेंकटराव देशमुख कॉलेज, बाभळगाव येथे विखिल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडिया सुरक्षा तसेच डिजिटल जगतात सुरक्षित आणि जबाबदारीने वावरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून सायबर हल्ले कोणत्या पद्धतीने होऊ शकतात, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच डिजिटल पॅरेंटिंग, डिजिटल सेफ्टी, स्नॅपचॅट व इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सुरक्षित वापर, प्रायव्हसी सेटिंग्ज, बनावट लिंक, फिशिंग आणि ऑनलाइन फसवणूक याबाबत प्रत्यक्ष उदाहरणे व डेमोच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
लाईव्ह डेमोमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. डिजिटल सुरक्षेच्या विविध पैलूंबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ‘Think Before You Click’ या सायबर सुरक्षा जनजागृतीपर पुस्तिकेचेही वाटप करण्यात आले. अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करणे, वैयक्तिक माहिती कोणासोबतही अनावश्यकपणे शेअर न करणे आणि सोशल मीडिया वापरताना योग्य खबरदारी घेणे, असा महत्त्वपूर्ण संदेश या पुस्तिकेतून देण्यात आला.
या सत्रासाठी नीहल बुलानी, नम्रता तोर आणि जाधव साहिल यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले.
कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य कल्याणकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत विविध प्रश्न विचारले.
“सुरक्षित डिजिटल भविष्य घडवण्यासाठी जागरूकता हीच पहिली पायरी” या संदेशासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
