बोरिवलीतील डोशातील उंदीर प्रकरणाला नवे वळण; व्हिडीओ व्हायरल, हॉटेलचा परवाना निलंबित आणि त्यानंतर हॉटेल मालकाकडून कथित खंडणी मागितल्याचा आरोप.
बोरिवलीतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डोशात उंदीर आढळल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात हॉटेल मालकाकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी दोन बहिणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर संबंधित हॉटेलमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित महिलेने पोलिसांना घटनास्थळी बोलावले आणि डोशात उंदीर आढळल्याचा दावा करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला.
हा व्हिडीओ २६ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या प्रकरणाची दखल घेत २८ सप्टेंबर रोजी संबंधित हॉटेलचा परवाना निलंबित केला. त्यामुळे हॉटेल प्रशासनाला व्यवसाय बंद ठेवावा लागला.
हॉटेल मालकाकडून २५ लाखांची मागणी केल्याचा आरोप
दरम्यान, हॉटेल मालकाने बोरिवली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ आणखी प्रसारित करण्याची तसेच पोलिसांकडे कायदेशीर तक्रार करण्याची धमकी देत संबंधित महिलांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
हॉटेल मालकाच्या तक्रारीनुसार, सुरुवातीला काही रक्कम देण्यात आली होती. मात्र, उर्वरित रक्कम देण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सापळा रचला.
५ ऑक्टोबर रोजी उर्वरित रक्कम देण्याच्या बहाण्याने हॉटेल मालकाने दोन्ही बहिणींना हॉटेलमध्ये बोलावले. त्या पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दोन्ही बहिणींविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बहिणींना अटक केलेली नसून, त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, डोशात उंदीर आढळल्याचा करण्यात आलेला दावा आणि त्यानंतर हॉटेल मालकाकडून कथितपणे पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप, या दोन्ही बाबींचा बोरिवली पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि डोशात नेमके काय आढळले होते, याबाबतचा तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
