चिखलोलीच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६वी ते १०वीसाठी मोफत प्रवेश सुरू

अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६वी ते १०वीसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत चिखलोली शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६वी ते १०वीसाठी मोफत प्रवेश; आवश्यक कागदपत्रे व संपर्क क्रमांक जाणून घ्या.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे यांच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, चिखलोली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे इयत्ता ६वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमांतर्गत ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधा

शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त इमारत व निसर्गरम्य वातावरणासह शासनामार्फत मोफत निवासी व शैक्षणिक साहित्य, मोफत गणवेश, विविध स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी, डिजिटल क्लासरूम, प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक वर्ग आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

तसेच मॉड्युलर किचन, डिजिटल स्कूल व इंटरअॅक्टिव्ह पॅनल, शासनामार्फत मोफत राहण्याची व जेवणाची सोय, भव्य क्रीडांगण व क्रीडा साहित्य, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, वसतिगृह व शालेय परिसरात सीसीटीव्ही सुरक्षा, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचारी, ई-लायब्ररी आणि म्युझिक क्लासरूम अशा विविध सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे :

  1. विद्यार्थ्याचा जातीचा दाखला
  2. पालकांचा उत्पन्नाचा दाखला
  3. रहिवासी दाखला (सरपंच/पोलीस पाटील)
  4. विद्यार्थ्याच्या आधीच्या वर्षाची मार्कलिस्ट
  5. विद्यार्थी संचयी पुस्तिका
  6. पासपोर्ट साईज फोटो – ५ प्रती
  7. आधारकार्ड
  8. विद्यार्थ्याचे बँक खाते पासबुक
  9. अपंग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंग प्रमाणपत्र
  10. वैद्यकीय प्रमाणपत्र

प्रवेशासाठी आरक्षण

शाळेच्या जाहिरातीनुसार प्रवेशासाठी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती (SC) – ८० टक्के, अनुसूचित जमाती (ST) – १० टक्के, विजाभज/भज (VJ/NT) – ५ टक्के, विमाप्र (SBC) – २ टक्के आणि अपंग प्रवर्ग – ३ टक्के आरक्षणाचा समावेश आहे.

अर्ज कुठे मिळणार?

निवासी शाळेत प्रवेशासाठी विहित नमुन्यातील अर्ज मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे कार्यालय, शासकीय निवासी शाळा, मौजे चिखलोली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे उपलब्ध होणार आहेत.

प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे कार्यालयाशी ०२२-२५३४१३५९ / २५३९२२३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच श्री. चेतन हिरे, सहायक शिक्षक यांच्याशी मो. ८२०८९९०५५४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणासह विविध शैक्षणिक, क्रीडा व इतर सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!