एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड आवश्यकतेबाबत महामंडळाने दिली मुदतवाढ. महिला लाभार्थ्यांना कार्ड नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत संधी; गावपातळीवर विशेष शिबिरे होणार.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) महिला प्रवाशांना सवलतीच्या तिकिटासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या अनिवार्यतेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या आणि ग्रामीण भागातील अनेक महिलांची अद्याप कार्ड नोंदणी झालेली नसल्याची बाब लक्षात घेऊन ७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत NCMC कार्डची अनिवार्यता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत महिला प्रवाशांना NCMC कार्ड नसतानाही एसटीच्या प्रवासभाड्यातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले हे पत्र सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, सनियंत्रण समित्या तसेच राज्यातील विविध विभागांच्या विभाग नियंत्रकांना पाठविण्यात आले आहे.
१ ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय
एसटी महामंडळाच्या यापूर्वीच्या २८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, १ ऑक्टोबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना महामंडळाच्या सवलतीच्या तिकिटांचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीदरम्यान महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या आणि कार्ड नोंदणीतील अडचणी समोर आल्या.
महामंडळाच्या परिपत्रकानुसार, महिला लाभार्थ्यांची संख्या मोठी असताना आतापर्यंत केवळ १.१० कोटी NCMC कार्डची नोंदणी किंवा वितरण झाले आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक महिलांपर्यंत या कार्डबाबतची माहिती पुरेशा प्रमाणात पोहोचलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक पात्र महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप बाकी आहे.
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अनिवार्यतेला तात्पुरती शिथिलता
महिला प्रवाशांना सवलतीच्या प्रवासापासून वंचित राहावे लागू नये आणि त्यांना NCMC कार्डची नोंदणी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, या उद्देशाने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत महिला लाभार्थ्यांसाठी NCMC कार्डची अनिवार्यतेची अट शिथिल राहणार आहे.
या कालावधीत सर्व महिला लाभार्थ्यांनी आपले NCMC कार्ड नोंदणीकरण करून घ्यावे, असे आवाहनही महामंडळाने संबंधित विभागांमार्फत करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश
महिला प्रवाशांची कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामपंचायत स्तरापर्यंत जाऊन विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या शिबिरांच्या आयोजनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. गावपातळीवर महिलांना कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देणे, नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि आवश्यकतेनुसार कार्डचे वितरण करणे, यावर भर देण्यात आला आहे.
३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के नोंदणी व वितरणाचे उद्दिष्ट
एसटी महामंडळाने ३१ डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत राज्यातील महिला लाभार्थ्यांची १०० टक्के NCMC कार्ड नोंदणी आणि वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी विशेष शिबिरांच्या माध्यमातून नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तसेच अद्याप NCMC कार्ड नोंदणी न केलेल्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पुढील काळात एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या कार्डची नोंदणी पूर्ण करण्याची संधीही महिलांना उपलब्ध झाली आहे.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ घेणे सुलभ होणार असून, आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे किती प्रभावीपणे राबविली जातात आणि निर्धारित मुदतीत १०० टक्के कार्ड नोंदणी व वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण होते का, याकडे महिला प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
