जळगाव जिल्ह्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; ३१५० बूथद्वारे पोलिओ लसीकरणाचे नियोजन

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यासाठी ३१५० बूथ आणि विशेष पथकांचे नियोजन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; ग्रामीण व शहरी भागात घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस दिला जाणार.

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. २८ जून २०२६ रोजी देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातही पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने सविस्तर सूक्ष्म कृती आराखडा तयार केला आहे.

या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी गुरुवार दि. २१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, डीन डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सन १९९५ पासून सातत्याने राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेमुळे १३ जानेवारी २०११ नंतर भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे मार्च २०१४ मध्ये भारताला पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला आहे.

यावर्षीच्या मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्र मिळून एकूण ४ लाख ७ हजार ९७८ बालकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३ हजार १५० बूथ, २ हजार ९२६ आयपीपीआय टीम, ६४९ मोबाईल टीम आणि १३१ ट्रान्झिट टीम कार्यरत राहणार आहेत.

मोहिमेच्या दिवशी बूथवर लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस तर शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

जिल्हा पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सर्व पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!