जळगाव शहरातील वाढते तापमान कमी करण्यासाठी महानगरपालिकेचा मोठा निर्णय; आगामी पावसाळ्यात १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक उष्णतेच्या तीव्र झळा सहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाढते तापमान कमी करण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आगामी पावसाळ्यात तब्बल १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.
या उपक्रमाबाबत महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, वाढते तापमान ही गंभीर समस्या असून त्यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेने सविस्तर नियोजन केले असून लवकरच वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. या मोहिमेत शहरातील उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शहरातील मुख्य महामार्ग, साईड रोड तसेच अतिक्रमण हटवण्यात आलेल्या मोकळ्या जागांवर प्राधान्याने वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. याबाबत प्रशासकीय पातळीवर नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौरांनी पुढे म्हटले की, केवळ वृक्ष लागवड करून थांबता येणार नाही, तर त्यांचे योग्य संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लावलेली झाडे जगवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
या उपक्रमामुळे शहरातील तापमानात घट होण्यास मदत होईल तसेच जळगाव अधिक स्वच्छ, हरित आणि सुंदर शहर बनण्यास हातभार लागेल, असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
