अमरावतीतील आझाद हिंद मंडळाच्या उपक्रमात गुणवंतांचा गौरव; यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न.
स्थानिक बुधवारा येथील आझाद हिंद मंडळातर्फे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त तसेच देशभक्त स्व. नानासाहेब बामणगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात माजी पालक मंत्री तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिक्षण, क्रीडा आणि संस्कार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
याच प्रसंगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य तथा भारतीय महाविद्यालय, अमरावती येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रशांत विघे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. राज्यशास्त्र विषयातील संशोधन, लेखन आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच त्यांच्या ४२ प्रकाशित पुस्तकांमुळे त्यांचा गौरव करण्यात आला. संशोधक, लेखक, स्तंभलेखक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने दर्जेदार लेखन करणारे अभ्यासक म्हणून प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, त्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला प्रेरणा, प्रोत्साहन आणि सकारात्मक दिशा मिळते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, शहरातील नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी, खेळाडू आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींशी संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले.

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील माहिती आणि लेख उपलब्ध करून देतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. क्र. -९३२६८७७७४९
