महाविद्यालयांतील वाढता कार्यभार, शिक्षकांची कमतरता, संचमान्यता आणि CHB शिक्षकांच्या नियुक्त्यांवरील प्रश्नांचा सखोल आढावा. उच्च शिक्षणासमोरील आव्हानांवर विशेष लेख.
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून टप्प्याटप्प्याने लागू केले. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पदवीच्या अंतिम वर्षापर्यंत या धोरणाची अंमलबजावणी पोहोचत असताना महाविद्यालयांतील अभ्यासक्रम, विषयसंख्या आणि अध्यापनाचा कार्यभार लक्षणीय वाढला आहे. मात्र या वाढलेल्या कार्यभारानुसार शिक्षकांची पदभरती किंवा तासिका तत्वावरील शिक्षक (CHB) प्राध्यापकांना पुरेशी मान्यता दिली जात नसल्याने उच्च शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व अकृषी विद्यापीठांना ३१ जुलै २०२६ पर्यंत तासिका तत्वावरील शिक्षक (CHB) नियुक्त्यांना अनिवार्यपणे मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत. वेळेत मान्यता न दिल्यास संबंधित विद्यापीठे व महाविद्यालये जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी तो केवळ प्रशासकीय आदेश म्हणून न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरला पाहिजे.
मात्र यानिमित्ताने अधिक गंभीर प्रश्न समोर येतो. जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे अभ्यासक्रम विस्तारला, विषयांची संख्या वाढली आणि काही विषयांमध्ये आठवड्याचा कार्यभार ४८ तासांपर्यंत पोहोचत असेल, तर त्या कार्यभारानुसार अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती का केली जात नाही? वाढत्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नियमित पदभरती किंवा किमान तासिका तत्वावरील शिक्षक (CHB) प्राध्यापकांना मान्यता देणे ही शासनाची जबाबदारी नाही का?
विदर्भातील अनेक विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांमध्ये आजही “सिंगल पोस्ट” व्यवस्था आहे. एका प्राध्यापकावर संपूर्ण विभागाचा भार टाकून NEPची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत. नवीन अभ्यासक्रम, बहुविषयक शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम, सतत मूल्यमापन, प्रकल्प, इंटर्नशिप आणि विविध शैक्षणिक उपक्रम यासाठी अधिक शिक्षकांची गरज असताना, शिक्षकांची संख्या मात्र वाढत नाही.
याहूनही मोठी विसंगती म्हणजे शासनाचे निकष आहे. संचमान्यता २०१७ च्या निकषांवर, विद्यार्थी संख्येचे काही जुने आधार, कार्यभाराचे वेगवेगळे संदर्भ आणि दुसरीकडे NEP-2020 ची अंमलबजावणी—या परस्परविरोधी धोरणांमुळे महाविद्यालये, प्राचार्य, संस्थाचालक आणि शिक्षक सर्वच संभ्रमात आहेत. एका बाजूला विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे कारण देऊन पदे कमी करण्याची प्रक्रिया राबविली जाते, तर दुसऱ्या बाजूला वाढलेल्या कार्यभारासाठी नवीन पदांना मान्यता दिली जात नाही. ही धोरणात्मक विसंगती शिक्षणाच्या गुणवत्तेलाच बाधा आणणारी आहे.
शासनाने हे समजून घेतले पाहिजे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० केवळ अभ्यासक्रम बदलण्याचे नाव नाही. त्यासाठी सक्षम मनुष्यबळ, पुरेशी शिक्षकसंख्या आणि आवश्यक आर्थिक तरतूदही तितकीच महत्त्वाची आहे. शिक्षकांशिवाय कोणतेही शैक्षणिक धोरण यशस्वी होऊ शकत नाही.
आज अनेक अनुदानित महाविद्यालयांमध्ये नियमित प्राध्यापक उपलब्ध नसल्याने तासिका तत्वावरील शिक्षक (CHB) प्राध्यापकांवर मोठी जबाबदारी येते. परंतु त्यांच्या नियुक्त्यांनाच विलंब होत असेल किंवा कार्यभार असूनही मान्यता मिळत नसेल, तर विद्यार्थ्यांचे अध्यापन कोण करणार? हा प्रश्न केवळ शिक्षकांचा नाही; तो लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित आहे.
म्हणूनच शासनाने केवळ तासिका तत्वावरील शिक्षक (CHB) मान्यतेसाठी अंतिम मुदत देऊन थांबता कामा नये. वाढलेल्या कार्यभाराचे वास्तववादी पुनर्मूल्यांकन करून आवश्यक तेथे नियमित पदभरती सुरू करणे, तासिका तत्वावरील शिक्षक (CHB) पदांना त्वरित मान्यता देणे, संचमान्यता आणि कार्यभाराचे निकष NEP-2020 शी सुसंगत करणे आणि विद्यापीठांना कालबद्ध कार्यवाहीसाठी उत्तरदायी धरणे, ही काळाची गरज आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची खरी कसोटी अभ्यासक्रमात नाही, तर वर्गात उभ्या असलेल्या शिक्षकांमध्ये आहे. वर्गात शिक्षकच नसतील, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे स्वप्न कागदावरच राहील. म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कार्यभार वाढला आहे; मग तो पेलण्यासाठी आवश्यक शिक्षकांची पदभरती आणि तासिका तत्वावरील शिक्षक (CHB) मान्यता शासन कधी देणार?
प्रा.डॉ. प्रशांत विघे
सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
९३२६८७७७४९

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
