जळगाव वाहतूक पोलिसांची मोठी मोहीम; अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई, लाखो रुपयांचा दंड व रस्ता सुरक्षेसाठी कठोर पावले.
शहरातील कॉलेज परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे तसेच इतर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्यात आली.
या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल २४ अल्पवयीन वाहनचालक आढळून आले. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन चालकांच्या पालकांना तातडीने बोलावून घेतले व त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे किती धोकादायक ठरू शकते, याबाबत पालकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी ८२ हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात ११९ ई-चलान जारी करण्यात आले.
ही कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
कॉलेज परिसरात वाढणारी वाहनांची गर्दी, अल्पवयीन चालकांकडून होणारे नियमभंग आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून, भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी 30 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट असल्याची माहिती दिली होती. तसेच 31 जुलै रोजी संपूर्ण जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे सांगितले. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, पावसाच्या काळात अनावश्यक प्रवास व पर्यटन टाळावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी-नाले, सखल भाग आणि जलमय होणाऱ्या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
