शाळांपासून ५० मीटर परिसरात चिप्स, शीतपेये, चॉकलेट्स आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी. ठाण्यात संयुक्त सर्वेक्षणानंतर कारवाई होणार.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व शाळांच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात जंक फूडची विक्री, जाहिरात, विपणन आणि मोफत वितरणावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ठाणे जिल्ह्यात शाळांबाहेरील टपऱ्या, दुकाने आणि हातगाड्यांचे सर्वेक्षण करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शाळांच्या प्रवेशद्वारांबाहेर विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या चिप्स, कोल्ड्रिंक्स, पाकीटबंद खाद्यपदार्थ, तळलेले पदार्थ, चॉकलेट्स आणि इतर जंक फूड विकणाऱ्या टपऱ्या व स्टॉल मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने या विक्रीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे.
एफडीएच्या आदेशानुसार शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात वेफर्स, शीतपेये, एनर्जी ड्रिंक्स, गोळ्या, चॉकलेट्स तसेच अत्याधिक मीठ, साखर किंवा चरबी असलेले प्रक्रिया केलेले आणि तळलेले खाद्यपदार्थ विकण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय अशा पदार्थांची जाहिरात, प्रचार, विद्यार्थ्यांना मोफत वाटप किंवा प्रलोभने देण्यासही बंदी राहणार आहे.
एफडीएने शाळांमधील भोजन केंद्रे, वसतिगृहांची स्वयंपाकगृहे, मध्यान्ह भोजन पुरवठादार आणि अन्नपुरवठा करणाऱ्या सर्व व्यावसायिकांकडे वैध परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक केले आहे. परवान्याशिवाय अन्न विक्री करणाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. मात्र, पाळणाघरे आणि डे-केअर केंद्रांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
लहान वयात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, दातांचे आजार, पचनाच्या तक्रारी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यास जंक फूड कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहाराची सवय लागावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शाळांपासून ५० मीटर परिसरात येणाऱ्या दुकाने, टपऱ्या आणि हातगाड्यांची संख्या निश्चित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन संयुक्तपणे सर्वेक्षण करणार आहेत. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांना नोटिसा बजावणे, परवान्यांची तपासणी, अन्न नमुन्यांची चाचणी आणि आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासनाकडून सविस्तर नियमावली प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणांचे सर्वेक्षण करून नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
