मिरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांमुळे गेल्या महिन्यात नऊ अपघात; रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी.
मिरा-भाईंदर शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहर खड्डेमुक्त ठेवण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारले आहेत. याशिवाय दरवर्षी खड्डे दुरुस्तीसाठी मोठा निधी खर्च केला जातो. मात्र, एवढा खर्च होऊनही शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. खोल खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटनाही घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महापालिकेने शहरातील खड्डे भरल्याचा दावा केला आहे. मुख्य मार्गांवरील खड्ड्यांची जबाबदारी एमएमआरडीएकडे असून त्यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. संबंधित खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक रस्त्यांवर पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसत आहेत.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे संतप्त नागरिक समाजमाध्यमांवर प्रशासनाविरोधात जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने या परिस्थितीसाठी महापौर डिंपल मेहता यांच्यावर टीका केली जात असून विविध मीम्स आणि टीकात्मक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे वाढत्या अपघातांची पोलिसांनीही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या महिनाभरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नऊ अपघात झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देत महापालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती काशीमिरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
