वसई-विरारमध्ये राडारोड्याविरोधात कारवाईचे दावे; मात्र महामार्ग आणि शहरातील मोकळ्या जागांवर अद्यापही बांधकाम कचऱ्याचे ढीग कायम.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह वसई-विरार शहरातील अंतर्गत रस्ते आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीरपणे राडारोडा (डेब्रिज) टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, शहराच्या सौंदर्याबरोबरच पर्यावरण आणि वाहतुकीसमोरही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रकारावर नियंत्रणासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार करून कारवाईचे दावे केले असले, तरी प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमधून निघणारा मोठ्या प्रमाणातील बांधकाम कचरा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याऐवजी रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत तसेच वसई-विरार शहराच्या विविध भागांत टाकला जात आहे.
वर्सोवा पुलापासून ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार ते विरारपर्यंत महामार्गाच्या कडेला राडारोडा आणि कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरातील मोकळ्या जागा आणि अंतर्गत रस्त्यांवरही हा कचरा टाकला जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असून, नाल्यांचे प्रवाह अडवल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्यासही हा राडारोडा कारणीभूत ठरत आहे.
राडारोडा रोखण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वसई-विरार महापालिका यांनी संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला होता. शहराच्या प्रवेशद्वारावर वर्सोवा पुलाजवळ तपासणी नाका उभारण्याचे आदेशही देण्यात आले आणि चौकीची उभारणी करण्यात आली. मात्र, संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय नसल्याने राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
वसई-विरारमधील अनेक भूखंड भरावासाठी मातीऐवजी सर्रास राडारोड्याचा वापर केला जात आहे. सिमेंट आणि काँक्रीटच्या या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास अडथळा निर्माण होत असून पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. शहरात मिळेल त्या मोकळ्या जागेत राडारोडा टाकला जात असल्याने वसई-विरारचे रूपांतर हळूहळू ‘डम्पिंग यार्ड’ किंवा ‘कचरा भूमी’मध्ये होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले की, महामार्गावर टाकण्यात आलेला राडारोडा नियमितपणे हटविण्यात येतो आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र, सर्व यंत्रणांकडून एकत्रित आणि कठोर कारवाई होत नसल्याने या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे कठीण ठरत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
