मुंबईतील ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराला वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता. महापालिकेने २३ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन केले.
गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातील वैद्यवाडीत असलेल्या सुमारे २०० वर्षे जुन्या विठ्ठल-रखुमाई मंदिराचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने मंदिराचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या असून, त्या २३ ऑगस्टपर्यंत महापालिका मुख्यालयातील प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत.
ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या मंदिराने स्वातंत्र्यपूर्व काळातही परिसरातील सामाजिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही ऐतिहासिक नोंदींमध्ये क्रांतिकारक चाफेकर बंधू या मंदिरात येत असत आणि त्यांच्या काही हालचाली या परिसरातून होत असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे मंदिराचा वारसा स्थळांच्या श्रेणी-१ मध्ये समावेश करण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने होत होती.
या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने आवश्यक कार्यवाहीसाठी महापालिकेला निर्देश दिल्यानंतर आता वारसा दर्जा देण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.
स्थळदर्शन नकाशा आणि छायाचित्रे पाहण्याची सुविधा
नागरिकांना मंदिराचा स्थळदर्शन नकाशा तसेच छायाचित्रे महापालिका मुख्यालयातील उपवास्तुशास्त्रज्ञ (विकास नियोजन) यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहता येणार आहेत. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, २३ ऑगस्टनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना किंवा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
१३ वर्षांच्या संघर्षाला यशाचा टप्पा
गिरगावातील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या संरक्षणासाठी विठ्ठल-रखुमाई सेवा समितीने तब्बल १३ वर्षे न्यायालयीन, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर सातत्याने लढा दिला. समितीचे अध्यक्ष किशोर भाटकर, सचिव सुमित्रा हिर्लेकर तसेच संजय मेर्वेकर, मिलिंद गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिराला वारसा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता मंदिराच्या हेरिटेज दर्जाचा प्रस्ताव अंतिम निर्णयाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, १३ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
