घाण पाण्यात चहाच्या किटल्या धुतानाचा व्हिडिओ व्हायरल; नालासोपारा स्थानक परिसरातील विक्रेत्यावर कारवाईची मागणी

नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोरील परिसरात घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात चहाच्या किटल्या धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी संबंधित चहा विक्रेत्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात चहाच्या किटल्या धुतल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर नालासोपारा स्थानक परिसरातील खाद्यविक्रेत्यांच्या स्वच्छतेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोरील रस्त्यावर साचलेल्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात एका चहा विक्रेत्याने चहाच्या किटल्या धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित चहा विक्रेता रस्त्यावर साचलेल्या अस्वच्छ पाण्यात चहाच्या किटल्या धुताना स्पष्टपणे दिसून येत आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक परिसर हा नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला असतो. दररोज हजारो नागरिक या परिसरातून प्रवास करतात. अशा ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्याकडून स्वच्छतेच्या नियमांची खुलेआम पायमल्ली होत असल्याने अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत चहा बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी घाण पाण्यात धुतल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासन, स्थानिक महापालिका तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन संबंधित चहा विक्रेत्याचा शोध घ्यावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि स्थानक परिसरातील सर्व खाद्यविक्रेत्यांची स्वच्छता व अन्न गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!