वन्यजीव तस्करी प्रकरणात सहा आरोपी अटकेत; मुंबईतून ५३ संरक्षित प्राणी-पक्ष्यांची सुटका

सीबीआय, डीआरआय आणि डब्ल्यूसीसीबीच्या संयुक्त कारवाईत मुंबई आणि पश्चिम बंगालमधून सहा आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत स्लो लोरिस, बिंटुराँग, भारतीय स्टार कासवे आणि अन्य संरक्षित प्राणी-पक्ष्यांची सुटका करून त्यांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

वन्यजीव तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटवर कारवाई करत ५३ संकटग्रस्त प्राणी-पक्ष्यांची सुटका करण्यात आली. जप्त वन्यजीवांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरोधात कारवाई करत मुंबईतून तीन आणि पश्चिम बंगालमधून तीन अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईत कायद्याने संरक्षित असलेल्या ५३ वन्यप्राणी आणि पक्ष्यांची सुटका करण्यात आली असून, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संरक्षित वन्यजीवांचा व्यापार करणाऱ्या टोळीबाबत महसूल गुप्तचर संचालनालयाला माहिती मिळाल्यानंतर विशेष पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील विविध ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात आली. यात मुंबईतील तीन आणि कोलकात्यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.

कारवाईदरम्यान १५ स्लो लोरिस, २ बिंटुराँग, २८ भारतीय स्टार कासवे, ६ इजिप्शियन गिधाडे आणि २ शिक्रा पक्षी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले हे सर्व वन्यजीव संकटग्रस्त प्रजातींच्या यादीतील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत एकूण विविध ३७ प्रजातींचे वन्यप्राणी आणि पक्षी जप्त करण्यात आले असून सध्या देखरेख करण्यासाठी त्यांचा ताबा मुंबईतील वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) या संस्थेकडे देण्यात आला आहे. संक्षेच्या पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या संबंधित प्राण्यांवर उपचार करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले जात आहे. यात स्लो लोरिस, बिंटुराँग, इंडियन स्टार कासवे आणि शिक्रा पक्ष्यांचा समावेश आहे.

वन्यजीवांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर वन विभागामार्फत त्यांचे मूळ अधिवासात पुनर्वसन केले जाणार आहे. काही वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास इतर राज्यात असून त्यानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!