माशांना प्रजननासाठी अधिक वेळ मिळावा आणि पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानात मच्छीमारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यामुळे मासेप्रेमींसह मच्छीमारांनाही आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देणे आणि पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानात मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिली.
यापूर्वी राज्याच्या सागरी हद्दीत १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांवर बंदी लागू करण्यात येत होती. पश्चिम मान्सूनच्या आगमनाच्या काळात मत्स्यसंपदेचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी हा कालावधी निश्चित करण्यात आला होता.
मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला लहान माशांची होणारी शिकार रोखण्यासाठी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांनी शासनाकडे केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समित्या तसेच राज्य सल्लागार आणि सनियंत्रण समितीचे अहवाल मागविण्यात आले होते. या समित्यांनीही बंदी वाढविण्याच्या निर्णयाला सकारात्मक अभिप्राय दिला.
शासनाच्या मते, वाढीव बंदीमुळे मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि जतन करण्यास मदत होणार असून, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी मिळेल. त्यामुळे भविष्यातील मत्स्यसंपदा टिकवून ठेवणे शक्य होईल. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासही या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
