मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई महानगरात प्रीमियम बस सेवांचा विस्तार झपाट्याने होत असून ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या वातानुकूलित बसमुळे दैनंदिन प्रवासाचे स्वरूप बदलताना दिसत आहे. बीकेसी, ठाणे, अंधेरी, कुलाबा, खारघर आणि नवी मुंबई विमानतळ यांसारख्या प्रमुख व्यावसायिक आणि निवासी भागांना जोडणाऱ्या मार्गांवर या सेवांचा वापर वाढत आहे.
गेल्या काही वर्षांत खासगी कार आणि टॅक्सीऐवजी आरक्षित आसन असलेल्या बस सेवांकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यास मदत होत असल्याचे दिसून येते. ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ या सेवांमध्ये प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
‘चलो’ बस सेवेकडे सध्या सुमारे १३० बस असून ठाणे–बीकेसी, खारघर–कुलाबा, ठाणे–अंधेरी आणि नेरुळ–कुलाबा यांसारख्या मार्गांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ३५ हून अधिक मार्गांवर या बस सेवा कार्यरत असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणाऱ्या मार्गांवरही सेवा सुरू करण्यात आली आहे.
दुसरीकडे, २०१५ मध्ये सुरू झालेल्या ‘सिटीफ्लो’ सेवेकडेही प्रवाशांचा वाढता कल दिसत असून या ताफ्यात सुमारे ६०० बस आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांना बीकेसी, लोअर परळ, अंधेरी, गोरेगाव आणि दक्षिण मुंबईशी जोडणाऱ्या मार्गांवर या बस सेवांची मोठी मागणी आहे. मेट्रो मार्ग ३ साठी फीडर आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीसाठीही या सेवांचा वापर सुरू करण्यात आला आहे.
सरासरी कमी वेळेत लांब पल्ल्याचा प्रवास, आरामदायी आसन व्यवस्था आणि ॲप-आधारित बुकिंग सुविधा यामुळे या प्रीमियम बस सेवांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून भविष्यात अशा सेवांचा विस्तार आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रवासी का वळत आहेत?
या मार्गांवर कॅबचा एक-वेळचा प्रवास साधारणपणे १ ते २ हजार रुपयांना पडतो.त्याच मार्गावर ”चलो प्रीमियम बस”चा प्रवास साधारण २५० ते ३०० रुपयांत होतो. शिवाय प्रवाशांना विनात्रास प्रवास करता येतो. खासगी वाहन धारकांना देखील शहरात पार्किगकरिता जागा शोधावी लागत नाही.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
