दाभोसा धबधब्यावरील ‘ग्लास ब्रिज’ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; कुलूपबंद प्रकल्पामुळे ऐन हंगामात पर्यटकांचा हिरमोड

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात दाभोसा धबधब्याजवळ उभारलेला दोन कोटी रुपयांचा अत्याधुनिक ग्लास ब्रिज पूर्ण झाला असून, सुरक्षिततेच्या प्रक्रियेनंतर पर्यटकांसाठी लवकरच खुला होणार आहे.

दाभोसा धबधब्यावर ग्लास ब्रिज आणि कासटवाडी झिपलाईन प्रकल्पामुळे पालघरमध्ये पर्यटनाला नवी दिशा; सुरक्षिततेनंतर लवकरच प्रकल्प सुरू होणार.

 जव्हार तालुक्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधब्याजवळ उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलाचे (ग्लास ब्रिज) काम पूर्ण झाले असले, तरी अद्याप पर्यटकांसाठी तो खुला करण्यात आलेला नाही. पावसाळ्यात धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असताना पुलावर प्रवेशबंदी असल्याने पर्यटकांना उंचावरून धबधब्याचे विहंगम आणि रोमांचक दर्शन घेण्याची संधी मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.

दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असून, दरवर्षी महाराष्ट्रासह गुजरातमधून हजारो पर्यटक येथे भेट देतात. पर्यटकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध सुविधा विकसित केल्या असून, त्यात नव्याने काचेच्या पुलाची भर पडली आहे. जून महिन्यात या पुलाचे काम पूर्ण झाले असून तो सुरू होण्याची पर्यटक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र जुलैपासून मुसळधार पावसामुळे धबधबा भरात वाहत असतानाही पुलाचे प्रवेशद्वार कुलूपबंद असल्याने पर्यटकांना त्याचा अनुभव घेता येत नाही.

दोन कोटींच्या निधीतून साकारला प्रकल्प

पालघर जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून हा ग्लास ब्रिज उभारण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील हा पहिलाच काचेचा पूल असून, पर्यटकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. या प्रकल्पात ११ फूट व्यासाचा गोलाकार काचेचा भाग आणि पाच मीटर लांबीचा वॉकवे तयार करण्यात आला आहे. तसेच आरक्षण कक्ष, कार्यालय, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम आणि स्वच्छतागृहांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कासटवाडीत झिपलाईन प्रकल्प अंतिम टप्प्यात

साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी जव्हार तालुक्यातील कासटवाडी येथे झिपलाईन प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. एक कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येत असून, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था, खाद्यसेवा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हा प्रकल्प पुढील महिन्याभरात सुरू करण्याचे नियोजन आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. इंदू रानी जाखड यांनी दाभोसा धबधब्याला भेट देऊन ग्लास ब्रिज प्रकल्पाची पाहणी केली. दाभोसा हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याचे नमूद करत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. या आराखड्यात वाहनतळ, तिकीट खिडकी, प्रतीक्षागृह, खानपान सुविधा, स्वच्छतागृहे आणि दिशादर्शक फलकांचा समावेश करण्यात येणार आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय डोंगरे यांनी सांगितले की, ग्लास ब्रिजच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!