रामनगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पुढे होणार आहे.
डोंबिवलीतील एका २६ वर्षीय विवाहित महिलेने व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडीओ आणि आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कल्याण जिल्हा संयोजक करण केसरीनाथ उल्लेंगल (३५) यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार महिला डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव परिसरात आई व भावांसोबत राहते. कौटुंबिक वादामुळे ती गेल्या चार महिन्यांपासून पतीपासून विभक्त राहत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, आरोपी करण उल्लेंगल हा तिच्या काकांचा मित्र असून दोन्ही कुटुंबांमध्ये सुमारे २० वर्षांपासून परिचय आहे. त्यामुळे ती त्यांना ‘दादा’ म्हणून संबोधत होती. या ओळखीमुळे दोघांमध्ये अधूनमधून फोन आणि व्हॉट्सॲपवर संवाद होत होता.
महिलेच्या आरोपानुसार, बुधवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिच्या व्हॉट्सॲपवर अश्लील स्वरूपाच्या व्हिडीओ क्लिप आणि आक्षेपार्ह मजकूर पाठवला. संबंधित व्हिडीओ तिने जतन करून घेतला. त्यानंतर आरोपीने ते संदेश स्वतःच्या बाजूने हटविल्याचा आरोपही तिने केला आहे.
या प्रकाराबाबत जाब विचारल्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲपवर अश्लील भाषेत लैंगिक स्वरूपाचे संदेश पाठविल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या घटनेमुळे आपला विनयभंग झाल्याची भावना व्यक्त करत तिने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी करण केसरीनाथ उल्लेंगल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील विनयभंगासंदर्भातील तरतुदी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांचा तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांची सत्यता निश्चित होणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
