टिटवाळा : टेकडी खोदून बेकायदा गाळ्यांची उभारणीचा आरोप; पर्यावरणाला धोका वाढल्याची नागरिकांची चिंता

टिटवाळ्यातील गणेशवाडी परिसरात टेकड्यांचे कथित उत्खनन करून बेकायदा व्यापारी गाळे व चाळी उभारल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे पर्यावरणीय समतोल, पाणीपुरवठा आणि शहर नियोजनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाने पाहणी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली.

 टिटवाळा परिसरातील टेकड्या आणि नैसर्गिक क्षेत्रांमध्ये बेकायदा बांधकामे वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. मोकळ्या सरकारी, वन विभागाच्या तसेच आरक्षित जमिनींवर अतिक्रमणानंतर आता काही ठिकाणी टेकड्या खोदून व्यापारी गाळे आणि चाळी उभारण्याचे प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.

टिटवाळ्यातील गणेशवाडी परिसर हा निसर्गरम्य टेकड्या आणि झाडींसाठी ओळखला जातो. मात्र, अलीकडच्या काळात काही भागांत जेसीबीच्या साहाय्याने टेकड्यांचे उत्खनन करून जमीन सपाट करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याबरोबरच पावसाळ्यात पाणी साचण्याचा आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या बांधकामांसाठी पाण्याचा अनधिकृत वापर होत असल्याने परिसरातील नियमित पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. याबाबत आवाज उठवणाऱ्या काही नागरिकांना दबावाला सामोरे जावे लागत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने यापूर्वीही अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवून अनेक बांधकामांवर कारवाई केली होती. तरीही काही भागांत नव्याने बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असून प्रभावी नियंत्रणासाठी अधिक सक्षम यंत्रणा तैनात करण्याची मागणी केली आहे. वाढत्या अतिक्रमणांमुळे पर्यावरण, नागरी सुविधा आणि शहर नियोजनावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.=याबाबत टिटवाळा ‘अ’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी संबंधित ठिकाणांची पाहणी करण्यात येत असून तक्रारींची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!