गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करा : महापौर दीपमाला काळे; शाडूच्या मातीच्या मूर्ती, निर्माल्य कलशाचा वापर करण्याचे आवाहन; ध्वनिप्रदूषण टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन

जळगाव शहरात गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन; शाडूच्या मातीच्या मूर्ती, निर्माल्य कलशाचा वापर आणि ध्वनिप्रदूषण टाळण्यावर भर.

जळगाव शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेचे आवाहन. शाडूच्या मूर्ती, निर्माल्य कलश, पारंपरिक वाद्ये आणि सुरक्षित विसर्जनाला प्राधान्य देण्याचे आवाहन.

 लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता जळगावकरांमध्ये शिगेला पोहोचली असून, यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी केले आहे. उत्सवादरम्यान शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि पर्यावरण अबाधित राखण्यासाठी नागरिक तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य

गणेशोत्सवादरम्यान जलप्रदूषण टाळण्यासाठी शक्यतो शाडूच्या मातीच्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे महापौरांनी सांगितले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करून पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

निर्माल्य कलशाचा वापर करा

गणेश मंडप परिसरात कचरा होणार नाही, याची गणेशोत्सव मंडळांनी विशेष दक्षता घ्यावी. पूजेनंतरचे निर्माल्य रस्त्यावर अथवा जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उत्सवादरम्यान सिंगल यूज प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे तसेच कानठळ्या बसविणाऱ्या मोठ्या आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे महापौर दीपमाला काळे यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून ध्वनीची मर्यादा राखावी आणि उत्सव आनंददायी वातावरणात साजरा करावा, असे त्यांनी आवाहन केले.

गणेशोत्सवातून समाजोपयोगी उपक्रमांना चालना

गणेशोत्सव मंडळांनी केवळ देखावे आणि सजावटीपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यांसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड द्यावी, असे महापौरांनी सांगितले.

विसर्जन मिरवणुकांमध्ये प्रशासनाला सहकार्य करा

गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकांदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची गणेशोत्सव मंडळांनी काळजी घ्यावी. उत्सवादरम्यान शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून आपल्या संस्कृतीचे आणि एकोप्याचे प्रतीक आहे. आपल्या बाप्पाचे स्वागत करताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. जळगाव शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक शहरवासीयाने जबाबदार नागरिक म्हणून हातभार लावावा,” असे आवाहन महापौर दीपमाला मनोज काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!