ठाण्यातील पदपथांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अतिक्रमण, उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.
ठाणे शहरातील विविध भागांमध्ये पदपथांखालील गटारांची झाकणे तुटलेली, खचलेली किंवा गायब असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार पदपथावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले असले तरी शहरातील अनेक पदपथ आधीच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. त्यातच उघडी गटारे आणि खराब झालेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. वसंत विहार, कळवा, विटावा, मुंब्रा आणि दिवा या भागांत अशा धोकादायक ठिकाणांची संख्या अधिक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी मनोरुग्णालय परिसरात उघड्या चेंबरमध्ये एका लहान मुलाचा पडण्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतरही शहरातील पदपथांच्या सुरक्षिततेबाबत अपेक्षित उपाययोजना झाल्या नसल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
विशेषतः वसंत विहार परिसरात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक पदपथांचा वापर करतात. मात्र अनेक ठिकाणी गटारांची झाकणे खराब अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही भागांत फेरीवाल्यांचे अतिक्रमण, झाडांच्या फांद्या आणि रस्त्याकडेला उभी असलेली वाहने यामुळे हे धोकादायक भाग सहज नजरेसही पडत नाहीत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या समस्यांकडे लक्ष देऊन तुटलेली झाकणे बदलणे, उघडी गटारे सुरक्षित करणे आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने सर्वेक्षण करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
