मुंबईत पावसाचा जोर वाढला; काही भागात वाहतूक कोंडी

मुंबई शहर आणि उपनगरांत झालेल्या जोरदार पावसामुळे सायन, दादर आणि वडाळा परिसरातील काही सखल भागांत पाणी साचले. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागांत पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे.

 मुंबई शहर आणि उपनगरांत मंगळवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रविवारपासून सुरू झालेल्या वळिवाच्या पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी मंगळवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून दिवसभर वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मागील २४ तासांत कुलाबा येथे ४९ मिमी, तर सांताक्रूझ येथे १२.३ मिमी पावसाची नोंद झाली. तासभर झालेल्या पावसामुळे सायनमधील गांधी मार्केट परिसरात बेस्ट बस बंद पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. दादर आणि वडाळा परिसरातील सखल भागांतही पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, मान्सूनने पुणे आणि अलिबागपर्यंत प्रगती केली असून लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २४ ते २७ जूनदरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याने पुढील काही दिवसांत नागरिकांना उष्णतेपासून अधिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!