एमपीएससीच्या परीक्षांमध्ये २०२६ पासून सीबीटी प्रणाली लागू होणार असून २०२७ पासून राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याची घोषणा आयोगाने केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेत मोठा बदल जाहीर करत २०२६ पासून संयुक्त पूर्व परीक्षा टप्प्याटप्प्याने संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट-सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या पद्धतीची सुरुवात महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ पासून होणार असून, या भरतीत २,६१९ पदांचा समावेश आहे. तसेच २०२७ पासून राज्यसेवा गट-अ, गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याचे नियोजन आयोगाने केले आहे.
सीबीडी बेलापूर येथील आयोगाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेतील सुधारणांमुळे आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या भविष्यात चार ते पाच पट वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आयोग दरवर्षी सुमारे सहा ते सात हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवितो. मात्र, वाढत्या पदसंख्येमुळे आणि उमेदवारांच्या संख्येमुळे पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करणे आव्हानात्मक ठरत असल्याने सीबीटी प्रणाली स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्व परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्यामागील उद्देश उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध करून देणे हा असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. अनेक उमेदवार एक-दोन गुणांनी अपात्र ठरत असल्याने त्यांना पुढील परीक्षेसाठी संपूर्ण वर्ष वाट पाहावी लागते. नव्या प्रणालीमुळे त्याच वर्षात पुन्हा परीक्षा देता येईल, निकालही लवकर लागतील आणि उमेदवारांवरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
सीबीटी पद्धतीमुळे उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि निकाल प्रक्रिया अधिक वेगवान होणार असल्याचा आयोगाचा दावा आहे. विविध सत्रांमध्ये परीक्षा झाल्यास गुणांचे समानीकरण (नॉर्मलायझेशन) आयआयटी मुंबई आणि सांख्यिकी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने केले जाणार आहे. मात्र, मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच एकाच सत्रात घेतली जाईल, असेही भीमनवार यांनी स्पष्ट केले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
