पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचा संदेश, मूर्ती स्थापना, सजावट, निर्माल्य व्यवस्थापन आणि विसर्जनाबाबत घ्यावयाची काळजी सविस्तर वाचा.
निसर्गाचा समतोल व संतुलन राखण्यासाठी निसर्गाला धरून प्रत्येक सण-उत्सव साजरा करणे गरजेचे आहे. कारण आपला समाज, आपली संस्कृती, आपले सण व उत्सव हे सर्व निसर्गाशी जोडलेले आहेत आणि निसर्गाला धरूनच ते साजरे होत आले आहेत.
आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आताच्या राष्ट्रीय जनगणना अहवालानुसार भारताची लोकसंख्या सुमारे १५० कोटींच्या जवळपास पोहोचलेली असून, प्रत्येक परिवाराच्या गरजा भागवण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा तसेच इतर मूलभूत गरजा या सर्व निसर्गाकडूनच प्राप्त होत असतात. खरे तर मानवाचे संपूर्ण आयुष्य निसर्गाशिवाय अपूर्ण आहे, हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे.
कोणतेही उत्पादन, धान्य किंवा वस्तू यांचा वापर व त्यानंतर त्यांची विल्हेवाट हा निसर्गाकडून समाजव्यवस्थेकडे आणि समाजव्यवस्थेकडून पुन्हा निसर्गाकडे जाणारा क्रम आहे. या चक्राचे योग्य व्यवस्थापन करणे हाच शाश्वत पर्यावरणाचा मूलभूत नियम आहे.
म्हणून कोणतेही काम, कार्य, व्यवसाय, व्यापार, उद्योग, सण किंवा उत्सव साजरा करताना निसर्गाचा विचार करणे अत्यावश्यक आहे.
आपला देश हा सण-उत्सवांचा आणि संस्कृतीचा देश आहे. गणेशोत्सव, नवरात्र, होळी, रंगपंचमी, ईद, गुढीपाडवा, जन्माष्टमी, पोळा, बुद्ध पौर्णिमा, पार्श्वनाथ जयंती, गुरुनानक जयंती इत्यादी विविध सण-उत्सव आपल्या देशात अनेक वर्षांपासून परंपरेने साजरे केले जात आहेत.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज संपूर्ण देशभर साजरा केला जातो. खरे तर या उत्सवाचा हेतू समाजामध्ये समानता, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव टिकवणे हा होता. मात्र, आजचा आधुनिक मानव स्वार्थी वृत्तीचा व विचारांचा होत चालल्याचे दिसून येते. आपण सर्वांसमोर चांगले दिसावे, आपला गाजावाजा व्हावा, आपली प्रसिद्धी व्हावी आणि सर्वांमध्ये आपण वेगळे दिसावे, असा स्वार्थी विचार व दृष्टिकोन दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर व निसर्गावर होत आहे, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
गणेशोत्सवाच्या बाबतीतही असेच चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दशकांमध्ये गणेशोत्सवातील मूर्ती, सजावट आणि देखावे अनेकदा पर्यावरणपूरक नसून पर्यावरणाला हानी पोहोचवणारे ठरत आहेत. गणेशमूर्तींसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा तसेच विविध रासायनिक घटक असलेल्या रंगांचा वापर केला जातो. या घटकांमुळे जलस्रोत आणि माती प्रदूषित होण्याचा धोका निर्माण होतो.
तसेच मोठ्या प्रमाणावर निर्माल्य व इतर कचरा निर्माण होतो. विविध ठिकाणी हार, फुले आणि प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या दिसतात. त्यातच डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण वाढते आणि मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
म्हणून कोणताही सण किंवा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे अत्यावश्यक आहे.
मानव स्वतःच्या आरोग्याची चांगली काळजी घेतो. स्वतः चांगले दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेतो. आरोग्य बिघडू नये म्हणून सकस व पौष्टिक आहार घेतो. हे सर्व मानवाला चांगले समजते. त्याचप्रमाणे निसर्गाचा आणि पर्यावरणाचा विचार करणेही आता आवश्यक आहे.
पर्यावरण बिघडू नये आणि पर्यावरणाचे आरोग्य खराब होऊ नये, यासाठी मानवाला प्रयत्न करावे लागणार आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्यामुळे मानवाचे आरोग्य, आयुष्य आणि जीवनमान धोक्यात येत आहे. यासाठी मानवाने प्रत्येक कार्य पर्यावरणपूरक पद्धतीने करून पर्यावरणाचे संतुलन राखणे नितांत गरजेचे आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाने “पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती टाळूया” तसेच “संदेश मूषक मामाचा व पर्यावरणपूरक गणेशाचा” असा संदेश दिला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी उपाय
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना खालील उपाययोजना कराव्यात, जेणेकरून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही.
१. पर्यावरणपूरक शाडू मातीची किंवा पूर्णपणे मातीची मूर्ती स्थापित करावी.
२. सजावट व देखाव्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळावा.
३. सजावट व देखावा करण्यासाठी कागद, कापड, बांबू, लाकूड, पाने, फुले आदी नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा.
४. शक्य तितक्या प्रमाणात नैसर्गिक रंगांचा वापर करावा.
५. ओला व सुका कचरा तसेच देवाला वाहिलेले निर्माल्य यांची स्वतंत्र व्यवस्था करावी.
६. निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करावे.
७. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमांमध्ये असावा.
८. गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी मानवनिर्मित किंवा कृत्रिम विसर्जन तलाव तयार करावा, जेणेकरून त्यामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करता येईल.
९. सजावट व देखावा शक्य तितका साधा व मर्यादित ठेवावा. तसेच ध्वनी यंत्रणेचा आवाज कमीत कमी ठेवावा.
१०. संपूर्ण गणेशोत्सवाच्या कालावधीत परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवून या उत्सवाचे पावित्र्य व मांगल्य जपावे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवात काय करू नये?
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना खालील बाबी टाळाव्यात.
१. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करू नये.
२. गणेशमूर्ती बनवताना जलप्रदूषण होईल असे रासायनिक रंग वापरू नयेत.
३. गणेशोत्सवाच्या परिसरात ज्वलनशील वस्तू आणि फटाक्यांचा वापर टाळावा.
४. सजावटीसाठी किंवा देखाव्यासाठी थर्माकोलचा वापर टाळावा.
५. गणेशोत्सवात जमा होणारा विविध प्रकारचा कचरा उघड्यावर फेकू नये.
६. मंडपाचा किंवा देखाव्याचा आकार अनावश्यकपणे मोठा ठेवू नये.
७. ध्वनिक्षेपकांचा आवाज जास्त वाढवणे टाळावे.
८. दर्शनाच्या वेळी गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करावे.
९. आपत्कालीन परिस्थितीत काही घटना घडल्यास घाबरून इकडे-तिकडे पळू नये.
१०. गणेशोत्सवातील स्वयंसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी आलेला प्रसाद किंवा निर्माल्य इकडे-तिकडे टाकू नये.
११. गणेशोत्सवादरम्यान पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
अशा प्रकारची नियमावली प्रत्येक गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी तसेच प्रत्येक कुटुंबाने लक्षात ठेवावी. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास निश्चितच मदत होईल.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती आवश्यक
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित कराव्यात.
या स्पर्धेतून पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या आदर्श गणेश मंडळांची निवड करून त्यांना योग्य बक्षीस देऊन सन्मानित करावे. यामुळे इतर गणेश मंडळेदेखील त्यांचे अनुकरण करून पर्यावरणपूरक संदेश देणारे देखावे व उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करतील, यात शंका नाही.
आमच्या घरातील २५ वर्षांची पर्यावरणपूरक परंपरा
आमच्या घरात गेल्या २५ वर्षांपासून शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी एका बादलीत पाणी घेऊन करता येते. पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती लवकर विरघळते. त्यामुळे मूर्ती बाहेर नैसर्गिक तलावात किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी नेण्याची आवश्यकता राहत नाही.
यासाठी प्रत्येक परिवाराने शाडू मातीपासून तयार केलेली किंवा मातीची मूर्ती घरात स्थापित करावी. घरगुती गणेशमूर्तीची उंची शक्यतो तीन फुटांपेक्षा जास्त नसावी.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा हेतू पूर्ण करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही आज काळाची गरज बनली आहे.
गणेशोत्सवाचे पावित्र्य व मांगल्य जपणे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
चला तर मग, या अभियानात सहभागी होऊया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया!

प्रा. डॉ. प्रसन्न देशमुख हे प्राध्यापक, संशोधक आणि लेखक असून त्यांना अध्यापन व संशोधन क्षेत्रातील १५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, पर्यावरणीय, कृषी आणि समकालीन विषयांवर ते संशोधनाधारित व विश्लेषणात्मक लेखन करतात. स्थानिक समाचार डिजिटल मीडियासाठी ते विविध सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित करून वाचकांना विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देतात.
Mo. no. 7038224819, Email- psdeshmukh17@gmail.com
