मुक्ताईनगर (जि. जळगाव) – जिल्ह्यात गाजत असलेल्या पीक विमा घोटाळ्याचे मुक्ताईनगर तालुक्यातही धागेदोरे समोर आले आहेत. शासनाची तब्बल ६ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच कॉमन सर्व्हिस सेंटर(CSC) चालकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात काही सीएससी चालकांनी संगनमत करून पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे उघड होत आहे. याआधी रावेर तालुक्यात चार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुक्ताईनगरमध्येही ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी मंडळ कृषी अधिकारी प्रथमेश थोरात यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश शांताराम पाटील (उचंदे), अनिरुद्ध तुकाराम अहिरे, चिरायू भुवनेश्वर चौधरी (दोघेही मुक्ताईनगर), विजय रामदास पाटील (अंतुर्ली) आणि डिगंबर सुकदेव चौधरी (कर्की) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी पीक विम्याचा गैरफायदा घेत राज्य शासनाची ३ कोटी ७८ लाख ३९ हजार ४५२ रुपये आणि केंद्र शासनाची २ कोटी ८६ लाख ६६ हजार २५२ रुपये अशी एकूण ६ कोटी ६५ लाख ५ हजार ७०४ रुपयांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६ (२) व ३१८ (४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करत आहेत.
मुक्ताईनगरात ५ सीएससी सेंटर चालकांवर गुन्हा दाखल :Action taken against 5 CSC center operators in Muktainagar
