बार्टीच्या वतीने पवईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; समता सप्ताहात नागरिकांचा मोठा सहभाग

पवई येथे बार्टी व समतादूत यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

बार्टी पुणेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पवई येथे सामाजिक समता सप्ताहांतर्गत विशेष कार्यक्रम संपन्न.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्यभर सामाजिक समता सप्ताह विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जात आहे. या अंतर्गत पवई येथील महात्मा जोतिबा फुले नगर, धम्मदीप प्रतिष्ठान येथे १४ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने समतादूत सिद्धार्थ शिरसाट यांनी अनुसूचित जातींसाठी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले आणि सामाजिक उन्नतीसाठी शासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली.

या उपक्रमाला महात्मा जोतिबा फुले नगर परिसरातील महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेश वानखेडे यांनी भूषवले.

मुंबई येथील समतादूत व प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांचीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. हा उपक्रम समाजकल्याण आयुक्त तथा महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, निबंधक डॉ. सुचिता शिंदे आणि विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमातून सामाजिक समतेचा संदेश देत डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला.

✍️ सिद्धार्थ शिरसाट, पवई -+91 98923 59807

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!