उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्तक्षेपामुळे अन्यायग्रस्त शेतकरी ज्ञानदेव नळकांडे यांना न्यायाची खात्री; देहत्याग सत्याग्रहाला तात्पुरती स्थगिती.
पिप्री खोद्री शिवारातील गट क्र. ३६ च्या शेत मोजणी व हद्द कायम करून देण्यात आणि त्याचे कायदेशीर अभिलेख उपलब्ध करून देण्यात भूमिअभिलेख कार्यालय, जळगांव जामोद या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य व जबाबदारीत कमालीचा कसूर करून दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या अभिलेखाविरुद्ध अन्याय ग्रस्त *श्री. ज्ञानदेव ओंकार नळकांडे रा. सुलज* या शेतकऱ्याने पुकारलेल्या दिवस निहाय सत्याग्रह दि. २८/०५/२०२६ – लाक्षणिक (पहिला दिवस),
दि. २९/०५/२०२६ – अन्नत्याग (दुसरा दिवस),
दि. ३०/०५/२०२६ – जलत्याग (तिसरा दिवस) आणि
दि. ३१/०५/२०२६ – देहत्याग (चौथा दिवस)
अशा वेळापत्रक नुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगांव जामोद येथे सुरु केले होते.
या सत्याग्रहाच्या निवेदनात एकूण ९ मागण्या केल्या होत्या, त्यातील मागणी क्र. १, २, ३, ५, ६, ७, ८ ह्या मागण्या भूमी अभिलेख कार्यालय जळगांव जामोद यांच्याशी संबंधित असल्याने मा. श्री. शैलेश काळे, (उपविभागीय अधिकारी) यांनी तत्काळ दखल घेऊन भूमी अभिलेख कार्यालय प्रमुख श्री. दत्तात्रय गोसावी यांना कार्यवाही करण्याचे आदेशित केले व तसे लिखित पत्र सुद्धा देऊन सर्वे क्र. १८ व सर्वे क्र. २० मधील सर्व खातेदारांच्या गटाची स्वतः हजर राहून मोजणी व हद्द कायम करण्याचे दि. ०४ जून २०२६ रोजी करण्याबाबतचे लिखित पत्र देऊन दोन्ही सर्वे क्रमांकातील उपस्थित शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटीस सत्याग्रह स्थळी दिल्या. तसेच संबंधित प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कार्यवाहीची प्रक्रिया करून त्याचा सविस्तर अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे प्रत्यक्ष उपोषणस्थळी श्री. दत्तात्रय गोसावी यांनी सर्वांसमक्ष सांगितले.
निवेदनात मागणी क्र. ४ व ५ पोलिस स्टेशन जळगांव जामोद कार्यालयाशी संबंधित असून त्याबाबत श्री. आनंद महाजन (डीवाय एस पी) यांनी तत्काळ तपास अधिकाऱ्यांना फोन करून कार्यवाहीचा आढावा घेतला व दोन दिवसात चौकशी अहवाल तयार करण्याची सूचना दिल्या; त्यानंतर चार ते पाच दिवसात पुढील मान्यतेसाठी सदर अहवाची मा. पोलिस अधीक्षक कार्यालय बुलढाणा सादर करावा आणि संबंधितांना तसा पत्रव्यवहार करावा, असे स्पष्ट निर्देश तपास अधिकारी श्री. पंडित (बीट जमादार) व श्री. नितीन पाटील (पोलिस निरीक्षक) यांना दिले.
उपविभागीय अधिकारी यांनी भूमिअभिलेख कार्यालयाच्या संदर्भ पत्र क्र./भूमापन/मौजे. पिप्री खोद्री/स. नं. १८ व २० मधील सर्व गट मोजणी/२०२६/ जा. क्र. ३१९; दि. २९/०५/२०२६ यानुसार कार्यवाही केली जाईल आणि इतर कार्यवाहीचे अहवाल संबंधित कार्यालयातून अहवाल प्राप्त होताच निवेदनातील इतर मागण्यांच्या अनुषंगाने तीन महिन्यात संपूर्ण कार्यवाही करण्याबाबत तजबीज करण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार श्री. किटे यांनी लिखित पत्र देऊन देहत्यागाचा सत्याग्रह स्थगित करण्याबाबत सर्व उपस्थितांसमक्ष विनंती केली.
उपविभागीय अधिकारी श्री. शैलेश काळे यांनी निवेदनातील मागण्यांचे गांभीर्य ओळखून तत्काळ कार्यवाही करण्यास सर्व संबंधितांना प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात बोलावून कायदेशीर योग्य ती कारवाई विनाविलंब करण्यास सांगून अन्याय ग्रस्त *श्री. ज्ञानदेव ओंकार नळकांडे रा. सुलज* या शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला; त्याबद्दल अन्यायग्रस्त शेतकरी *श्री. ज्ञानदेव नळकांडे* यांनी उपविभागीय अधिकारी यांचे ऋण व्यक्त केले आणि माझ्या सोबत घडलेला प्रसंग पुन्हा इतर कुठल्याही शेतकऱ्यांवर येऊ नये, अशी विनंती सुद्धा केली.
या सत्याग्रहाला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी समर्थन देऊन प्रत्यक्ष उपस्थिती सुद्धा दर्शवली; त्यात *मा. दत्ताभाऊ पाटील, गजानन वाघ, प्रकाश भिसे, संतोष डीवरे, वसंतराव मिरगे, शेख सईद शेख कदीर, लियाकत खान सफदर खान* या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानले.
देहत्याग सत्याग्रहापासून परावृत्त करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावरून संबंधित विभागाशी प्रत्यक्ष चर्चा घडवून न्यायाभिमुख संवाद घडवून आणला, त्याचा सकारात्मक परिणाम सर्व शेतकऱ्यांच्या समाधानावर होऊन अन्याय ग्रस्त शेतकऱ्याला न्यायची खात्री पटली, त्यामुळे देहत्याग सत्याग्रहाला तूर्तास स्थगिती देऊन विहित मुदतीत कायदेशीर कारवाई न झाल्यास आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय झाल्यास भूमीअभिलेख कार्यालय जळगांव जामोद ला ताळे ठोकण्याचा इशारा सुद्धा दिला.

सचिन सरदार हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. बातम्या आणि जाहिरातींकरिता आपण संपर्क करू शकतात –
📱9309831933
Email- ssbuisnes97@gmail.com
