जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीसमोर अंतर्गत आव्हान. रेश्मा काळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत वाढली.
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर आता अंतर्गतच आव्हान उभे राहिले आहे. भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) मध्ये नाराजी उफाळून आली असून, या नाराजीचे रूपांतर थेट बंडखोरीत झाल्याचे चित्र आहे.
महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळेल, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि पदाधिकारी दीपक धांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला डावलण्यात आल्याची भावना काही शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याचे सूत्रांकडून समजते.
रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, या जागेवर आतापर्यंत कोणत्याही महिलेला संधी देण्यात आली नसल्याचे नमूद केले. त्यामुळे जनतेचा आवाज म्हणून आणि महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेते नाराजांची समजूत काढण्यासाठी हालचाली करत असल्याची माहिती मिळत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी परिस्थिती शांत होते की अधिक गुंतागुंतीची बनते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घडामोडींमुळे जळगाव विधान परिषद निवडणूक अधिक चुरशीची आणि अनिश्चिततेकडे वाटचाल करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
