Global Korea Scholarship 2026 मिळवत धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने जागतिक स्तरावर यश संपादन केले. उच्च शिक्षणासाठी दक्षिण कोरियात जाणार तानिया भारंबे.
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी कु. भारंबे तानिया निखिल हिने अत्यंत प्रतिष्ठेची Global Korea Scholarship (GKS) 2026 मिळवत महाविद्यालयासह संपूर्ण खान्देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरिया प्रजासत्ताकाच्या National Institute for International Education (NIIED), Ministry of Education यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारी Global Korea Scholarship (GKS) ही जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तींमध्ये गणली जाते. या शिष्यवृत्तीअंतर्गत तानिया भारंबे हिला Dong-A University, South Korea येथे Master’s पदवीसाठी उच्च शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
या शिष्यवृत्तीमध्ये भारत-कोरिया ये-जा विमानप्रवास, संपूर्ण शिक्षण शुल्क, मासिक विद्यावेतन (Stipend), वैद्यकीय विमा तसेच इतर शैक्षणिक सुविधा समाविष्ट आहेत. शिष्यवृत्तीचा कालावधी १ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२९ असा असून या कालावधीत तानिया दक्षिण कोरियामध्ये उच्च शिक्षण पूर्ण करणार आहे.
तानियाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल धनाजी नाना महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळातर्फे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय चौधरी यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रवी केसुर यांनी तानियाचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक, संशोधन आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, धनाजी नाना महाविद्यालयातील वाणिज्य विभाग विद्यार्थ्यांना केवळ पदवी शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता लेखाशास्त्र, बँकिंग, वित्तीय व्यवस्थापन, करप्रणाली, उद्योजकता, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देतो. आधुनिक अध्यापन पद्धती, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामुळे येथील विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवत आहेत.
कु. तानिया भारंबे हिचे हे यश तिच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि गुणवत्तेचे प्रतीक असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश तिच्या यशातून मिळत आहे.
तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार आदरणीय शिरीष दादा चौधरी, व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कु. तानिया भारंबे हिचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
