सामान्य शेतकरी कुटुंबातून प्राध्यापकपदापर्यंतचा प्रवास आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष यांवर आधारित पंकज वैद्य यांचा प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्यावरील लेख.
शिक्षक मतदारसंघाची गेली निवडणूक गाजली ती पैठण्यांच्या वाटपामुळे. पैठण्या न मिळालेल्या शिक्षकांनी, कशाप्रकारे फोन करून आपल्याला पैठण्या मिळाल्या नाहीत, असे सांगितले, याच्या चर्चादेखील रंगल्या. पैठण्यांच्या बदल्यात मतदान करणे, ही बाब शिक्षकी पेशाला कलंक लावणारी ठरली. कारण एखाद्या शिक्षिकेने स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पैठणीदेखील लोकांना मताच्या बदल्यात घेतलेली पैठणी वाटू लागली. आपला शिक्षक पैठणीच्या बदल्यात मतदान करतो, अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे, ही बाब शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ठरली.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी पैठण्यांना नकार देण्यात आला. परंतु, ज्या पैठण्यांच्या भरोशावर आपण गेल्या निवडणुकीत निवडून आलो, त्यांना पैठण्या वाटण्याचा मोह कसा सुटणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पैठणी, तिच्या आत दोन हजार रुपये आणि एक लहानशी सोन्याची नथ, एवढे साहित्य घेऊन एक महाशय पुन्हा एकदा मतदानाच्या रिंगणात उतरले आहेत.
परंतु, शिक्षक मतदारसंघाला यावेळी त्यांच्यातलाच आपला एक, त्यांच्याकरता तळमळीने काम करणारा, त्यांच्याकरता झटणारा, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आणि त्यांच्या समस्या जाणून घेणारा असा शिक्षक आमदार म्हणून हवा आहे. आज अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या यादीकडे एक नजर टाकल्यास, एकूणच उमेदवारांपैकी प्राध्यापक प्रशांत विघे यांच्यात हे गुण असल्याचे दिसून येते.
प्रशांत सर माझ्या परिचयातील आहेत, या कारणास्तव मी त्यांचे कौतुक करत आहे, अशातला भाग नाही. त्यांची अनेक भाषणे मी स्वतः ऐकली आहेत. अतिशय पोटतिडकीने ते आपली बाजू मांडत असतात. त्यांच्या वक्तृत्वशैलीचा अनुभव त्यांच्या प्रचारदौऱ्याच्या निमित्ताने अनेकांना आला असेल, असा मला विश्वास आहे. विधान परिषदेत जाऊन आपल्या प्रश्नांना वाचा फोडणारा उमेदवार जर शिक्षकांना हवा असेल, तर प्रशांत विघे यांना पर्याय नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे.
कुठल्याही प्रकारची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेला हा उमेदवार आहे. भाऊ खासदार आहे, म्हणून मला आमदार व्हायचे आहे किंवा वडील आमदार होते, म्हणून मला आमदार व्हायचे आहे, अशी पार्श्वभूमी प्रशांतला लाभलेली नाही. एका साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आपल्या मेहनतीने घेतलेल्या शिक्षणाच्या भरोशावर ते प्राध्यापक झाले.
त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. कारण त्या कामाचा लेखाजोखा त्यांच्या जाहीरनाम्यात तपशीलवार सांगितला गेला आहे. त्यामुळे एक चांगला आणि लढाऊ व्यक्तिमत्त्वाचा माणूस, या दृष्टिकोनातून मी प्राध्यापक प्रशांत विघे यांच्याबद्दल लिहीत आहे.
गेल्या काही वर्षांपासून विविध वर्तमानपत्रांमधून लेखन करत, ते शिक्षण क्षेत्रातील समस्या मांडत आहेत. त्यांचे लेख अभ्यासपूर्ण असतात आणि मुद्द्यापासून भरकटलेले नसतात, याचा अनुभव वाचकवर्गाने घेतला असणार, यामध्ये शंका नाही.
शिक्षकांच्या नव्या पिढीला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, याकरता वर्धा येथे विघे सर उपोषणाला देखील बसले होते. आश्वासनानंतर या उपोषणाची सांगता झाली, तरी आपला मुद्दा त्यांनी कधी बाजूला ठेवला नाही. सातत्याने लेखनातून त्यांनी आपली लढाई सुरूच ठेवली होती.
सरांकडे एखादे काम घेऊन जावे आणि सर ते करणार नाहीत, असे कधीच घडले नाही. आज पैशांचे गठ्ठे सोबत घेऊन जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यांच्यामध्ये प्रशांत आर्थिकदृष्ट्या सर्वात कमकुवत उमेदवार असावा. तरीसुद्धा मित्रमंडळींकडून वर्गणी गोळा करून त्यांच्या प्रचाराचा खर्च सुरू आहे.
प्रचाराकरता जी गाडी ज्या दिशेला जाणार, त्या गाडीच्या पेट्रोलचा खर्च आणि गाडीतील प्रचारकांच्या जेवणाचा खर्च ते स्वतः करतील; उमेदवाराला एकाही पैशाचा त्रास देणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.
गेल्या दोन वर्षांत विघे सरांनी आपला मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढला आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. म्हणूनच धनदांडग्यांच्या भाऊगर्दीत आजही त्यांचे नाव चर्चेत आहे. ज्यांना शिक्षकांच्या समस्यांची जाणीव नाही, केवळ वाडवडिलांच्या भरोशावर ज्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे, अशांच्या भाऊगर्दीत प्रशांत विघे यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसत आहे.
पैशाने कमकुवत असले, तरी आयुष्यभर जीव लावून जोडलेली माणसे हीच विघे सरांची खरी ताकद आहे. त्यांच्या विजयाकरता त्यांना शुभेच्छा देत असतानाच, प्रशांत विघे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांना विजयी करावे, असे आवाहन मी समस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना करत आहे.
— पंकज वैद्य
अमरावती
संपर्क : ९८२३०१४०४०

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील माहिती आणि लेख उपलब्ध करून देतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. क्र. -९३२६८७७७४९
