विधी विद्यार्थ्यांना मंत्रालयातील कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹१०,००० विद्यावेतन.
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्रालयातील विधेयके, अध्यादेश, नियम आणि अधिसूचनांच्या मसुदा तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता यावी, यासाठी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागात सहा आठवड्यांची इंटर्नशिप आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी गुणवत्तेच्या आधारे १२ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, इंटर्नशिप यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ₹१० हजारांचे विद्यावेतन आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या इंटर्नशिपचा कालावधी २४ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर २०२६ असा असेल. या काळात विद्यार्थ्यांना विधेयके व अध्यादेशांचे मसुदे तयार करण्याची प्रक्रिया, कायद्यांअंतर्गत नियम व अधिसूचनांची प्रारूपे तयार करणे, तसेच राज्य विधिमंडळात विधेयके मंजूर होण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणे, संविधानातील तरतुदींचा प्रत्यक्ष वापर समजून घेणे आणि विधी विधान शाखेतील अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचाही अनुभव मिळणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचा उपक्रम सहा वेळा राबविण्यात आला आहे.
च वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षातील, तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षातील तसेच एलएलएमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदाराचे वय २८ वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये किंवा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीच या उपक्रमासाठी पात्र असतील.
या उपक्रमासाठी पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमातून सहा, तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमातून चार आणि एलएलएममधून दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड गुणवत्तेच्या आधारे होईल. एमएचटी-सीईटी लॉ किंवा सीएलएटी परीक्षेत किमान ७० गुण मिळविलेले असणे आवश्यक आहे. समान गुण असल्यास बारावीच्या परीक्षेतील गुणांचा विचार केला जाईल.
विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे तसेच ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. एका महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून केवळ एकाच विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांना ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत एआयसीटीई इंटर्नशिप पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत प्रवेश परीक्षेची गुणपत्रिका, बारावी किंवा पदवीचे गुणपत्रक, शेवटच्या उत्तीर्ण परीक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि महाराष्ट्राचा रहिवासी दाखला अपलोड करणे आवश्यक आहे. ई-मेल, टपाल किंवा प्रत्यक्ष सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
मंत्रालयातील विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेत ही इंटर्नशिप पार पडणार असून, विद्यार्थ्यांना दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहावे लागेल. इंटर्नशिपदरम्यान केलेल्या कामाची नोंद ठेवणे, गोपनीयतेचे पालन करणे आणि अखेरीस कार्यअहवाल सादर करणे बंधनकारक असेल. उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह ₹१० हजारांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
